Political Feature: विरोधकांचे टेन्शन भाजप वाढवणार?

jalgaon-digital
3 Min Read

नरेंद्र जोशी

नाशिक | Nashik

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात भाजपची निवडणूक ‘वॉर रुम’ सज्ज झाली आहे. ’महाविजय २०२४’ या मोहिमेंतर्गत पक्षाने रणनीतीही आखली आहे. भाजपकडून जे मतदारसंघ शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटां)साठी सोडतील, तेथेही भाजपचे निवडणूक प्रमुख असतील त्यामुळे या वॉर रुमचा त्यांनाही उपयोग होणार आहे. साम, दाम. दंंड, भेद नितीचा पुरेपुर वापर करुन महायुती सज्ज झाली आहे. त्या मानाने विरोधकांच्या तंबुत अजुनही शांतताच दिसत आहे.

भाजपने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली आहे. पाच राज्यांत विधानसभांच्या निवडणुका आणि त्यानंतर २०२४ च्या लोकसभेची निवडणूक असल्याने पाच वर्ष मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी गरीबांना स्वताकडे आकर्षीत केले आहे. त्यावर विरोधकांना टिका करणेही अवघड केले आहे.

भाजपच्या सर्व विद्यमान आमदार-खासदार यांना आपल्या मतदारसंघात वॉर रुमच्या सूचना केल्या आहेत. जेथे भाजपचे आमदार-खासदार नाहीत, तेथे भाजपने मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नियुक्त केले आहे. त्यांना वॉर रुमाच्या सूचना दिल्या आहेत. भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. त्यांचे जागावाटप अद्याप झालेले नाही. पण जेथे ज्या पक्षाचे विद्यमान आमदार-खासदार आहेत, त्या जागा शक्यतो त्या पक्षांकडेच राहतील, असे सूत्र निश्चीत केले आहे.

त्याही जागांची अदलाबदल होऊ शकते. ज्या जागा भाजप, शिंदे व अजित पवार गटाकडे नाहीत, त्या जागांचे वाटप भाजप पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार केले जाणार आहे.त्यात नाशिक लोकसभा ही कदाचीत भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे. धुळे मतदार संघात शिंदे गटाचे उमेदवार नशीब अजमावण्यासाठी चाचपणी करत आहे.त्यामुळे नाशिकचे खा. हेमत गोडसे व धुळ्याचे डॉ. सुभाष भामरे यांना आगामी काळ आव्हाणांचा राहणार आहे.

भाजपने महाजनसंपर्क अभियानात ६० हजार घरात जाऊन आणि ३० हजार नागरिकांशी मोबाईलवर सरल अ‍ॅप सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी व्हॉट्सप समूह तयार केले आहे. प्रत्येक आमदार, खासदार व निवडणूक प्रमुख समाजमाध्यमांवर सक्रिय केले आहे. वॉर रूमच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत कशी पोहोचतील याची खातरजमा करणार आहे.

याशिवाय वॉर रूमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघ आणि तेथील उमेदवारांवर लक्ष ठेवणार आहे; तसेच प्रत्येक मतदारसंघातील समस्या आणि विषयांची माहितीही या माध्यमातून घेणार आहे.निवडणूक तयारीचा आढावा वॉर रुमच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. महायुतीतील मित्रपक्षाकडील जागाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने स्वताःवर घेतल्यानेच आगामी काळात विरोधकांचे टेन्शन वाढणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *