Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यास्मार्ट सिटीला पोलीस संरक्षण; तरी काम बंदच

स्मार्ट सिटीला पोलीस संरक्षण; तरी काम बंदच

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात स्मार्ट सिटी कंपनीच्या ( Smart City Company )वतीने अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. दरम्यान जुने नाशिक परिसरात अभियंताला झालेल्या मारहाणनंतर पोलीस संरक्षण मिळत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल झाले होते.

- Advertisement -

दरम्यान दोन दिवसांपूर्वी 16 मार्गांवर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळाल्याने कामे सुरू झाली आहे. दरम्यान अद्याप शहराच्या महत्त्वाच्या अशा महात्मा गांधीरोडसह अनेक कामांना अद्याप सुरुवात न झाल्यामुळे अशा वर्दळीच्या ठिकाणी लहान, मोठे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

शहरातील जुने नाशिक भागात राजकीय कार्यकर्त्यांनी पाईपलाईनसाठी रस्ते खोदल्याने एका अभियंत्याला राष्ट्रवादीशी संबंधित कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

हे निमित्त करून जोपर्यंत पोलीस बंदोबस्त मिळत नाही, तोपर्यंत काम न करण्याची भूमिका ठेकेदाराने घेतली होती. त्यामुळे अवघे गावठाण वेठीस धरले गेले होते. आधीच खोदकाम त्यात पावसामुळे साचलेले पाणी यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत पोलीस आयुक्तांकडे स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. जुन्या नाशकातील देशपांडे वाड्यापासून पुढे जलवाहिनीचे काम करण्यासाठी जेसीबी लावून काम सुरू असताना बाजूच्या वाड्याला तडे गेले. त्यामुळे काम थांबवण्यासाठी दमदाटी करीत काही कार्यकर्त्यांनी ठेकेदाराच्या अभियंत्याला मारहाण केली.

याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली होती, तसेच जोपर्यंत पोलीस संरक्षण मिळत नाही तोपर्यंत कामच सुरू करणार नसल्याची भूमिका ठेकेदाराने घेतली होती. त्यामुळे या घटनेनंतर नाशिक आणि पंचवटी गावठाणातील खोदून ठेवलेले रस्ते तसेच अन्य कामे बंद ठेवण्यात आली होती. तर दुसरीकडे शहरात जोरदार पाऊस देखील सुरू झाल्याने रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

22 जुलैपासून शहरातील 16 रस्त्यांची कामे सुरू आहेत. अशा ठिकाणी पोलीस संरक्षण मिळाल्याने काम सुरू झाले आहे. ठेकेदाराच्या अभियंत्याला मारहाण झाल्यापासून पोलीस संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्यात येईल, असे ठेकेदाराने कळवले होते. हळूहळू सर्व ठिकाणी काम सुरू होणार.

– सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी

- Advertisment -

ताज्या बातम्या