Wednesday, April 24, 2024
Homeनगर१४५ परप्रांतीय नगर पोलिसांकडून स्थानबद्ध : वाहने जप्त

१४५ परप्रांतीय नगर पोलिसांकडून स्थानबद्ध : वाहने जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरमार्गे परराज्यात जाणाऱ्या तब्बल १४५ जणांना नगर पोलिसांनी चेकिंगदरम्यान पकडले. या सगळ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पकडलेल्या या लोकांना निवारागृहात दाखल करण्यात आले आहेत.

कोणत्याही परिस्थितीत नगर सोडून पुढे जाता येणार नाही. असे स्पष्ट करत या लोकांची निवास व जेवणाची सोय जिल्हा प्रशासनाने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उपजिल्हाधिकारी अजय मोरे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. विरेंद्र बडदे यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

कोरोना च्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन असून सगळीकडे वाहतूक व संचारबंदी आहे. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. अशा स्थितीत नगरमार्गे परराज्यात जाणारी वाहने नगर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार भागातील ही लोक खासगी वाहनाने प्रवास करत होते. जिल्हा प्रशासनाने त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्यास बंदी केल्यामुळे त्यांना एक स्वतंत्र जागा दिली आहे.

त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व जेवणाची सोय जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे. आंध्रप्रदेशातील कडप्पा येथून निघालेले ५३ लोक हजारो किलोमीटरचे अंतर कापून नगरात पोहचले. नगर पोलिसांच्या चेकिंग दरम्यान मात्र ते अडकले. या लोकांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला म्हणून कोतवाली पोलीस ठाण्यात १८८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पकडलेले ५३ लोक हे मुळचे राजस्थानमधील आहे.रोजीरोटीसाठी ते आंध्रप्रदेशातील कडप्पा येथे गेले होते. तेथे कामबंद झाल्याने ते एक इनोव्हा व चार क्रुझर जीपमधून राजस्थानला जाण्यास निघाले. पोलिसांची नजर चुकवत त्यांनी हजारो किलोमीटरचे अंतर पार करत नगरात आले. नगरमार्गे ते राजस्थानला जात होते. राजस्थानमध्येही कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे या लोकांना पकडून पोलिसांनी त्यांना महापालिकेने उभारलेल्या निवारागृहात दाखल केले.

कोणत्या राज्यातील किती?
राजस्थान ७१, बिहार १५, कर्नाटक २०, उत्तर प्रदेश ३९

अनावश्यक बाहेर पडू नका
जिल्ह्यातील अनेक लोक परराज्यात अडकले आहे. देश लॉकडाऊन असल्याने आहे तेथेच राहावे लागणार आहे.कायदा मोडून राजस्थानला जाणाऱ्या लोकांच्या चार जीप जप्त करून त्यांना निवारा देण्यात आला आहे. नगरकरांनीदेखील अनावश्यक घराबाहेर पडू नये. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. संदीप मिटके, डीवायएसपी, नगर शहर.

- Advertisment -

ताज्या बातम्या