Wednesday, April 24, 2024
Homeनगरविषारी गवताने मृत पावलेल्या गायींची संख्या सहा

विषारी गवताने मृत पावलेल्या गायींची संख्या सहा

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगांव तालुक्यातील धोंडेवाडी व अंजनापुर या दोन गांवामध्ये अज्ञात आजाराने पाच गायी मृत्यमुखी पडल्या होत्या त्यात आणखी एक गाय दगावली

- Advertisement -

असून आता मृत्युमुखी पडलेल्या गायींची संख्या सहा झाली आहे.या ठिकाणी जिल्हा पशुसंवर्धन आधिकारी डॉ.सुनील तुंबारे यांनी काल बुधवारी भेट देऊन माहिती घेतली व आजारी जनावरांवर उपचार करण्यास मार्गदर्शन केले.

त्यांच्यासमवेत कोपरगाव लघुचिकीत्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.अजयनाथ थोरे, कोपरगांव प.स.चे पशुधन विकास अधिकारी डॉ.दिलीप दहे व डॉ. अशोक भोंडे उपस्थित होते. यावेळी माहिती देताना जिल्हा पशुसंवर्धन आधिकारी डॉ. सुनील तुंबारे म्हणाले, हिरव्या गवतामुळे नायट्रेट व नायट्राइटची विषबाधा होते.

ही विषबाधा ढोलआंबा, तांदुळचा, काटेमाठ, कोंबडा गवत यासारख्या गवतापासून होते.अनेक ठिकाणी गवत कापून जनावरांना खाऊ घालण्यात येत आहे. यातील कोवळ्या गवतात भरपूर प्रमाणात नायट्रेट असल्याने काही ठिकाणी विषबाधा होऊन जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. शेतातील बांधावर व मळ्यात उगवणारे कोवळे गवत व त्यात असणारे नायट्रेटचे भरपूर प्रमाण तीव्र दुष्काळानंतर उगवणार्‍या गवतात सतत पाऊस चालू असताना बाष्प वाढल्याने नायट्रेटचे प्रमाण वाढते.

हे पोटात गेल्याने रक्तात जलदगतीने शोषले जाते आणि रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे हृदय आणि फुप्फुसे निकामी होऊन जानावरांचा मृत्यू ओढावतो. याचे प्रमाण मुळात आणि खोडात जास्त असते. पानाच्या शेंड्यात आणि फुलात कमी असते. ही विषबाधा झालेल्या जानावरांची लाळ गळते, स्नायूंमध्ये कंप होतो, पोट दुखते, जुलाब होतात,अशक्तपणा येतो, तोंड व डोळ्यांची आंतरत्वचा चॉकलेटी किंवा निळी पडते, तोंडाने श्वास घेतात, रक्त चॉकलेटी दिसते व शेवटी जनावरे कोमात जाऊन मृत्यु होतो.

कधीकधी सुरुवातीची लक्षणे न दिसता अचानक ओरडून जमिनीवर आडवे पडतात व मृत्यु पावतात. लक्षणे आधारीत उपचार आणि नायट्रेट विषबाधेवर परिणामकारक औषध वापरल्यावर लक्षणे कमी होतात. यासाठी जनावरांना कोवळे गवत खाऊ घालू नये, हिरवे गवत कापताना साधारण सहा इंच खोडापासून अंतर ठेवून कापावे, हिरव्या गवतासोबत कोरडा चारा किंवा इतर चारा मिश्रण करून द्यावा, एखाद्या पिकाला युरीया दिल्यानंतर लगेच त्यातील गवत खायला देऊ नये. कळपात विषबाधेची लक्षणे दिसताच ताबडतोब गवत खाऊ घालणे बंद करावे.

इतर चारा उपलब्ध असेल तर सध्या गवत न घातलेले बरे आजाराची लक्षणे दिसताच पशुवैद्यक यांच्याकडून उपचार करून घ्यावा असे अहवानही डॉ. तुबांरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या