Tuesday, April 23, 2024
Homeनगरप्लॅस्टिकविरोधी मोहीम कठोर; दोन व्यापार्‍यांवर गुन्हा

प्लॅस्टिकविरोधी मोहीम कठोर; दोन व्यापार्‍यांवर गुन्हा

कारवाईत आणला होता अडथळा : कापड बाजारात खळबळ

अहमदनगर (प्रतिनिधी) – बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधात महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांमार्फत सुरू असलेल्या कारवाईत अडथळा आणल्याप्रकरणी कापड बाजारातील दोन व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या या कठोर कारवाईमुळे व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. 17) कापडबाजारात महापालिकेच्या कर्मचार्‍यांना कारवाईस विरोध करून हाकलून दिले होते. मँगो किड्सचे सुरेश राज पुरोहित व मोटवाणी साडी सेंटरचे पमनदास मोटवाणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टिकचा वापर अद्यापही सुरू असल्याने महापालिकेने त्या विरोधात मोहीम सुरू केलेली आहे.

मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मोहिमेअंतर्गत मंगळवारी पथकामार्फत बाजार पेठेत दुकानांमध्ये तपासणी सुरू असताना कर्मचार्‍यांनी मँगो डॉल किड्स वर्ल्ड व मोटवाणी सारीज् या दोन दुकानांमधून बंदी असलेल्या नॉन ओव्हन बॅग्ज जप्त केल्या. शासनाच्या निर्देशानुसार पाच हजार रुपयांचा दंड भरण्याची सूचना कर्मचार्‍यांनी दुकानातील व्यापार्‍यांना केली. मात्र, त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. तसेच कर्मचार्‍यांकडून पंचनामा करण्यात आल्यानंतर ‘तुम्हाला जे करायचे ते करा’, असे म्हणत कर्मचागर्‍यांना अरेरावी केली.

या घटनेनंतर बुधवारपासून बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या वापराविरोधातील कारवाईची मोहीम थांबविण्यात आली होती. संबंधित व्यापार्‍यांवर कारवाई करण्याचा अहवाल पथकामार्फत जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे केला होता. तसेच पोलीस बंदोबस्ताचीही मागणी केली होती. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शनिवारी (दि. 21) स्वच्छता निरीक्षक विधाते यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिल्याने पुरोहित व मोटवाणी यांच्या विरोधात कलम 353, 34 प्रमाणे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाजारपेठेतून बाहेर येईनात
प्लॅस्टिक विरोधात महापालिकेने कठोर मोहीम हाती घेतली आहे. दररोज दंड वसुली व प्लॅस्टिक जप्तीची कारवाई केली जात आहे. कापडबाजार किंवा शहरातील मध्यभागातील दुकानांमध्ये ही कारवाई केली जात आहे. मात्र ठिकठिकाणी भाजीविक्रेत्यांकडेही मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर होत आहे. शहरात विविध ठिकाणी भाजी बाजार आहेत. तेथे मात्र अद्याप कठोर कारवाई होताना आढळून येत नाही. बाजारपेठेत कारवाई करतानाच भाजी विक्रेत्यांकडील प्लॅस्टिक जप्त करण्याची कारवाई होणे गरजेचे झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या