Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगBlog : फिनिक्सच्या राखेतून मोर उठेल का?

Blog : फिनिक्सच्या राखेतून मोर उठेल का?

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार आणि लेखक जयंत पवार (Writer Jayant Pawar) यांच्या आकस्मिक जाण्याने साहित्यविश्वाला धक्का बसला होता. त्यांच्या एकांकिकांचा धांडोळा घेत जागवलेल्या त्यांच्या काही आठवणी…..

काही दिवसांपूर्वी एका सोहळ्यात दिवशी जयंत पवार सरांची पहिल्यांदा भेट झाली आणि नंतर अधूनमधून भेटी, बोलणं होत राहील….

- Advertisement -

त्याच्या आधीच काही दिवसांपूर्वी प्रविणने “अधान्तर” (Adhantar) या नाटकाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग (Video Recording) दाखवले होते. प्रचंड अस्वस्थ केलं होतं त्या नाटकाने! जयंत पवारसरांनी आपल्या लेखणीतून “अगदी आपल्या आजुबाजुला वावरत असावीत अशी साधेपणाने अवतरलेली खरीखुरी सच्ची पात्र चितारून परिस्थितीनं त्यांच्या पदरात टाकलेलं धगधगणारं वास्तव मांडलं आहे”.

तेव्हापासून जयंत सरांच्या लिखाणानं मनावर गारुड केलं होतं. त्यांनी केलेली नाटकांची समीक्षणं वाचायची सवय लागली. नाटक कसं बघाव? नाटक कसं करावं? याबद्दल त्यांच्या लिखाणामुळे समृद्ध होण्याकडे वाटचाल सुरू झाली.

“प्रयोग मालाड” (Prayog Malad) ने 2018 मध्ये “लेखक एक नाट्यछटा अनेक” (Lekhak ek Natyachhata anek) या स्पर्धोत्सवाचा अत्यंत आगळा वेगळा प्रयोग केला होता.ते एकमेव लेखक होते जयंत पवार सर!

प्रविण परिक्षक असल्यामुळे मला प्राथमिक फेरी व अंतिम फेरी अनुभवण्याची संधी मिळाली. त्या महोत्सवात दरवेशी, मेला तो देशपांडे, उदाहरणार्थ, शेवटच्या बिभत्साचे गाणे, शांतारामायण, घुशी, अंतिम रेषा आणि द्वंद, होड्या, वाळवी, विठाबाईचा, कावळा, अशांती पर्व, लिअर या जयंत पवार यांनी लिहिलेल्या प्रकाशित, अप्रकाशित एकांकिकांची नाट्यपर्वणीच अनुभवायला मिळाली.

मेला तो देशपांडे (Mela to Deshpande) ही एकांकिका म्हणजे आयुष्यात काही करू न शकलेल्या आणि एकही गोष्ट मनासारखी न झालेल्या मध्यमवर्गीय जगू देशपांडेला 35 व्या वर्षी आलेला मृत्यू हीच त्याच्या मनासारखी घडलेली एकमेव घटना. तिचा तो उत्सव करतोय. त्याच्या मृत्यूचं त्याला पोचवणारेही एकप्रकारे सेलिब्रेशन करतायत. मानवी जीवनातील आणि त्यातही मध्यमवर्गीय आयुष्यातील विपरितता, विसंगती दिसते आहे. ती देशपांडेला मेल्यावरही सुटत नाही. त्याचं मरणंही निरर्थक ठरतं. मानवी आयुष्यातली निरर्थकता एकांकिकेतून अधोरेखित केली आहे.

शांतारामायण ही उपहासाच्या अंगाने जाणारी एकांकिका माणसांची श्रद्धास्थानं असतात. ती पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या मिथकांतून बनलेली असतात. या मिथकांना धक्का लागला की माणसांच्या भावना दुखावतात. त्यांचा उद्रेक होतो. असाच एक पत्रकार मिथकाच्या मागच्या काल्पनिक आणि खर्‍या गोष्टींचा शोध घेतो तेव्हा माणसं विवेकबुद्धीने विचार करण्याऐवजी पत्रकाराचाच बळी घेतात. या एकांकितेत समाजमन कसं काम करतं हे दाखवलं आहें.

घुशी ही एकांकिका हे यातल्या दोन बायकांच्या जगण्याचं रुपक आहे. एकमेकांवर चिखल उडवत चिखलातच लडबडत रहाणार्‍या घुशीप्रमाणे भागी आणि शेवंता एकमेकींना छळत त्रास देत जगतायत. दोघी एकमेकींना पराभूत करत एक शोकांतिका रचत जातात.

कोणी एक विठाबाई मरते आणि तिच्या घरात एक कावळा शिरतो या साध्याश्या घटनेतून विठाबाईचा कावळा या एकांकिकेला सुरूवात होते. एक भन्नाट नाट्य घडतं. विठाबाईची मुलं आणि शेजारी तो विठाबाईचा आत्मा समजतात आणि त्याच्या अतृप्त इच्छेचा शोध घेऊ लागतात. पण त्यातून लोकांच्या मनात दडलेल्या अंधश्रद्धेचा फायदा घेत घरातल्या पोटभाडेकरूला हाकलण्याचं कारस्थानं रचलं जातं. यशस्वी केलं जातं. विठाबाई, कावळी आणि गरोदर असलेली पोटभाडेकरू स्त्री या तिन्ही स्त्रियांची कोंडी एकांकिका मांडते.

महाभारत महायुद्धानंतर द्रौपदी आणि एक सर्वसामान्य स्त्री यांच्यात झडलेला संवाद म्हणजे अशांती पर्व ही एकांकिका.

एका राष्ट्रीय किर्तीच्या ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शकाने आपल्या प्रेयसीला जाळण्याचा केलेला प्रयत्न ही बातमी बहुचर्चित ठरली होती. या घटनेतून लिअर ही एकांकिका जन्माला आली. सुमारे तीस वर्षापूर्वी घडलेल्या ह्या सत्य घटनेवर ही एकांकिका बेतलेली आहे. फक्त एकांकिकेत प्रेयसी मरते. वास्तवात तसं झालेलं नाही. एकांकिकेचा विषय हा एक कलावंतांचा स्वत्व शोधण्याचा आत्मनाशाच्या गर्तेत जाऊनही पुन्हा उभं राहण्याचा झगडा आहे. शेक्सपिअरचं किंग लिअर हे नाटक तो बसवतो. पण लिअरचा अहंकार त्याचा कब्जा घेतो. लिअर त्याचं जगणं व्यापून टाकतो. विप्लव मुझुमदारच्या मनोविश्वात चालणार्‍या नाटकातला लिअर आणि त्याचं प्रत्यक्ष आयुष्य यांच्यातल्या सीमारेषा पुसट होतात. लिअरची स्वगतं, विप्लवची स्वागतं, दोघातले संवाद यातून नाटकाची लय आकारते. या जयंत पवार यांनी लिहिलेल्या सुरूवातीच्या काळातील एकांकिका म्हणजे एका संवेदनशील नाटककाराच्या निर्मिती प्रक्रियेची नांदीच होती.

महानुभव मासिकाच्या एका अंकात त्यांची ‘चौकशी’ ही लघुकथा प्रवीणने वाचली. एका दुर्दैवी गरीब स्त्रीचं अर्भक भटके कुत्रे रात्री तिचा डोळा लागल्यावर तिच्या कुशीतून पळवतात. आणि लचके तोडून खाण्यात यशस्वी होतात. ही त्या कथेची सुरूवात. या एका घटनेतूनच त्यांनी कित्येक समाज व्यवस्थांची झापडं फाडली! त्या कथेतलं नाट्य ती वाचतांनाच प्रविणला जाणवलं आणि मला नाट्य रुपांतर करायल प्रवृत्त केलं. त्यावेळी जयंत सरांनी अगदी आनंदाने परवानगी दिली आणि जिनियसतर्फे होणार्‍या प्रयोगाला शुभेच्छा दिल्या. या नाटकाचा व्हिडिओ त्यांनी बघावा अशी खूप इच्छा होती. पण त्याचं आजारपण आणि कोरोना महामारी यात ते जुळून आलं नाही ही खंत आता उरली आहे.

“आमचं तुमचं नाटक” या लोकेश शेवडे लिखित, प्रविण दिग्दर्शित नाटकाच एक अभिवाचन त्यांच्यासमोर केलं होतं. त्या टिमचा सदस्य होण्याचं भाग्य लाभलं होतं. त्यांना नाटक आवडलं. सखोल चर्चाही केली. कॅन्सरशी ते कित्येक वर्षापासून लढत होते. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा ज्वलंत आणि बळावत चाललेल्या प्रश्नांवर परखड आणि अभ्यासपूर्ण लिखाण करणार्‍या या मृदू आणि संवेदनशील माणसाचं स्वरयंत्र कॅन्सर या दुर्धर आजाराने जखडून टाकलं होतं. हा किती क्रूर विरोधाभास आहे.

जिनियसच्या “आमचं तुमचं नाटक” च्या एका प्रयोगाला ते आले होते. प्रयोगानंतर मी केलेल्या भूमिकेचं सूक्ष्म विच्छेदन त्यांच्याकडून समजून घ्यावं म्हणून मी त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले. पण त्यांना जास्त बोलता येत नव्हतं. तू चांगली भूमिका केलीस एवढंच ते बोलू शकले आजाराशी त्यांचा चालू असलेला लढा दिसत होता ते त्यांचे हल्ले वारंवार परतवत होते आणि त्याचवेळी त्यांचं लिखाणही चालू होतं. इतक्या निगुतीने तयार केलेला जीव असा अकाली परत घेण्याचा मोह निसर्गाला का होत असावा? जयंत सर तुम्ही अजुन हवे होतात. या समाजाकडून तुमच्या असलेल्या अपेक्षा सत्यात उतरतील का? फिनिक्सच्या राखेतून मोर उठेल का?

– रश्मी काळोखे, अभिनेत्री, लेखिका

- Advertisment -

ताज्या बातम्या