कोल्हारच्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ट्रकचे अग्नितांडव

jalgaon-digital
3 Min Read

संजय कोळसे

कोल्हार – कोल्हार बुद्रुक येथील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपावर मध्यप्रदेशच्या एका साखरेने भरलेल्या मालट्रकच्या डिझेल टँकचा अचानक स्फोट होऊन अग्नितांडव घडले. मालट्रकमध्ये असलेल्या साखरेच्या गोण्या व 8 टायर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पेट्रोल पंपावरील सर्व कर्मचार्‍यांनी तातडीने आग विझविण्यासाठी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नामुळे अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. पंपावरील फिलिंग पॉईंट बचावल्याने मोठा अनर्थ टळला. या पेट्रोल पंपाला खेटूनच असलेले अन्य पेट्रोल पंप ही सुरक्षित राहिल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

कोल्हार येथील उद्योजक अजितकुमार कुंकूलोळ यांच्या मालकीचा अनिश हायवे सर्व्हीसेस या नावाने रिलायन्स पेट्रोल पंप आहे. काल शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हे भयंकर थरारनाट्य घडले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पेट्रोल पंपावर सकाळच्या सुमारास काही मालट्रक, चार चाकी तसेच दुचाकी वाहने पेट्रोल, डिझेल भरत होते. पेट्रोल पंप पॉईंटच्या अवघ्या 5 -6 फूट अंतरावर रांगेत उभा असलेला मालट्रक (क्रमांक एमपी 14 जीबी 1477) च्या डिझेल टँकचा अचानक मोठा आवाज होऊन स्फोट झाला. त्यातून अग्नीज्वाळा फेकल्या गेल्या. ट्रकच्या डिझेल टँकला खेटूनच सायलेन्सर होता. कदाचित त्यामुळे स्फोट झाला असावा. काही समजण्याच्या आतच डिझेल ट्रकच्या खाली पडले आणि बघता बघता आग वेगाने भडकली. ट्रकचे 8 टायर, बॉडी, अन्य भागांनी तसेच भरलेल्या साखरेच्या गोण्यांनी वेगाने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केले. एका मागोमाग एक-एक टायरचा बार होत होता. तसतशी आगीचे लोळ फेकले जाऊ लागले.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेली वाहने सैरभैर झाली. त्यांना पेट्रोल पंपाबाहेर काढण्यात आले. याच कालावधीत पेट्रोल पंपावरील सर्व कर्मचार्‍यांनी न डगमगता प्रसंगावधान राखत पंपावरील फायर फायटरचे नळकांडे फोडून आग विझविण्यात सुरुवात केली. पेट घेतलेल्या ट्रकमधून प्रचंड अग्निज्वाला भडकत होत्या. धुराचे प्रचंड लोळ आकाशात झेपावत होते. कर्मचार्‍यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. पंपावरील फायर फायटरचे 7 नळकांडे तसेच शेजारील खर्डे पाटील यांच्या पेट्रोल पंपावरील 3 नळकांडे आणि वाळू फेकून अखेर अर्ध्या तासात अर्थात अकरा वाजता आग विझवली. तोपर्यंत प. विखे पाटील कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचला. मात्र तोपर्यंत आग कर्मचार्‍यांनी आटोक्यात आणली होती.
यामध्ये मालट्रकची 8 टायर जळून खाक झाले. मालट्रकमध्ये असलेल्या बर्‍याच साखरेच्या गोण्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. या पंपाला खेटूनच कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे यांचा खर्डे पाटील अँड सन्स नावाने पेट्रोल पंप आहे. त्यासमोर सोसायटी पेट्रोल पंप आहे. वेळेत आग आटोक्यात आली नसती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र सुदैवाने रिलायन्स पेट्रोल पंपावरील तसेच राहुल ट्रॅक्टरच्या सर्व कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला.

सदर मालट्रक हा सोलापूर जिल्ह्यातील अंबालिका कारखान्यातून साखरेच्या गोण्या घेऊन नीमज, मध्यप्रदेशमध्ये निघाला होता. या घटनेत ट्रक चालक व क्लिनर हेदेखील या आगीच्या भडक्यातून बालंबाल बचावले. 16 वर्षापुर्वी कार्यान्वित झालेल्या या पेट्रोल पंपमधील ही पहिलीच दुर्घटना होती. याबाबत कर्मचार्‍यांना विचारले असता कंपनीकडून वेळोवेळी आम्हाला आग विझविण्याचे ट्रेनिंग दिले जाते. त्याचा आज फायदा झाल्याचे त्यांनी बोलून दाखविले. रोडवरील बघ्यांनी मात्र हे थरारनाट्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यासाठी गर्दी केली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *