Saturday, April 27, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

राहुरी तालुक्यात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट

राहुरी |प्रतिनिधी|Rahuri

सध्या सुरू असलेल्या लालपरीच्या चक्काजाम आंदोलनामुळे राहुरी तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतूकदारांनी त्याचा चांगला गैरफायदा घेतला आहे. बससेवा बंद असल्यामुळे दामदुप्पट भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूटमार सुरू झाली आहे. तर अनेक बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांसह महिलांनाही अरेरावी करीत असल्याने राहुरीत बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍यांची दबंगगिरी वाढली आहे. या लुटमारीला वाहतूक पोलीस प्रशासनाने आळा घालावा. तसेच लूटमार करणार्‍या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

- Advertisement -

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे. यासह अन्य मागण्यांसाठी दि. 7 नोव्हेंबरपासून एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. राज्यभर पुकारण्यात आलेल्या या संपामध्ये नगर जिल्ह्यातील एसटी कर्मचार्‍यांनी देखील सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे लालपरीचे चक्काजाम झाले. दरम्यान लालपरीच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा फटका शिर्डी व शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी आलेल्या भक्त प्रवाशांना तसेच इतर प्रवाशांना बसत आहे. लालपरीच्या चक्काजाम आंदोलनामुळे राहुरी तालुक्यातील खासगी अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

आंदोलनापूर्वी राहुरी ते नगर एसटीचे भाडे 55 रुपये होते. त्यावेळी खासगी प्रवासी वाहतूक चालक 50 रुपये भाडे घेत होते. आता 70 ते 100 रुपयांपर्यंत मनमानी भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात आहे. त्याचप्रमाणे राहुरी ते वांबोरी, राहुरी ते सोनई तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात चालणारे वाहने प्रवाशांची लूटमार करत आहेत. राहुरी ते राहुरी फॅक्टरी या आठ किमी अंतरासाठी बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक 20 रुपयांपासून 40 रुपयांपर्यंत भाडे वसूल करीत आहेत. सध्या राहुरी ते पुण्याचे भाडे 500 रुपयांपर्यंत घेतले जात आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

नुकताच दिवाळी सण होऊन ओवाळी चालू आहे. त्यामुळे प्रवाशांची ये-जा सुरू आहे. याचा गैरफायदा घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट करण्याचे काम वाहनचालकांकडून होत आहे. वाहतूक प्रशासनाने या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

या बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांमध्ये सर्रास व खुलेआम क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी कोंबून भरले जातात. तर वाहनचालक निम्मे शरीर बाहेर ठेवून वाहन चालवित असल्याने अनेकदा अपघात होतात. प्रवाशी भरण्यावरून राहुरी बसस्थानकावर या वाहनचालकांमध्ये अनेकदा टोळीयुद्धही भडकलेले आहे. तर अनेक वाहनचालक नगर-मनमाड महामार्गावरून नशेतच वाहन चालवित असल्याने प्रवाशांना नाईलाजाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तर राहुरी बसस्थानकासमोर ही बेकायदा वाहने अस्ताव्यस्त लावण्यात येत असल्याने बसस्थानकासमोरच अनेक अपघात झालेले आहेत. या बेकायदा प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना आवर घालण्याची मागणी त्रस्त प्रवाशांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या