Friday, April 26, 2024
Homeजळगावएमआयडीसीतील हॉटेलात रंगली पार्टी

एमआयडीसीतील हॉटेलात रंगली पार्टी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलात याच परिसरातील पोलीस ठाण्यात कार्यरत एका अधिकार्‍याच्या सेवानिवृत्तीची जोरदार पार्टी रंगली.

- Advertisement -

करोनाच्या नियमांचे ÷उल्लंघन अन् 100 जणांची गर्दी असलेल्या मद्यपार्टीची शहरात चांगलीच चर्चा रंगली असून नियम व कायदे फक्त सर्वसामान्यांसाठीच का? संबंधित अधिकार्‍यांवर पोलीस कर्मचार्‍यांवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे कारवाई करतील काय? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या परिसरात एका मद्याचे दुकान असलेल्या व्यावसायिकाने या पार्टीची प्रायोजकत्व केल्याचीही चर्चा आहे.

शहरातील पोलीस ठाण्यात नुकताच कार्यरत अधिकारी सोमवारी सेवानिवृत्त झाला. सेवानिवृत्ती पूर्वी संंबंधित अधिकार्‍याने त्याच्या परिचयातील तसेच तो स्वतः कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यासाठी एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलात विशेष मद्याच्या पार्टीचे आयोजन केले.

एकीकडे शहरात कोरोनाच्या पाश्वर्र्भूमिवर कडक निर्बंध राबविण्यात येत आहे. याच निर्बंधात संबंधित हॉटेलात या अधिकार्‍याच्या पार्टीला रात्रीच्या वेळी सुुरुवात झाली.

या सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकार्‍याला शुभेच्छा देण्यासाठी तसेच पार्टीसाठी 100 हून अधिक कर्मचारी उपस्थित असल्याची चर्चा आहे. हॉटेलाच्या एका स्वतंत्र ठिकाणी कर्मचार्‍यांसाठी मद्याची खास सोय तर होतीच, शिवाय सोबतीला जेवणही ठेवण्यात आले होते.

त्या दुकानदाराकडून पार्टीचे प्रायोजकत्व

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये एका मद्य व्यावसायिकाने बेकायदेशीरपणे मद्यविक्री केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. रंगेहाथ मुद्देमाल जमा करण्यात येवून संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते.

तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी केलेल्या चौकशीअंती या बेकायदेशीरप्रकरणात पोलीसांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर संबंधित मद्याचे दुकान ज्या हद्दीत होते, त्याच परिसरातील पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षकांसह तीन कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले होते.

आता काल रात्री रंगलेल्या पोलीस अधिकार्‍याच्या सेवानिवृत्तीच्या पार्टीचे प्रायोजकत्व हे कारवाई झालेल्या संबंधित मद्य दुकानदारानेच केल्याचीही चर्चा आहे.

वाढदिवस करणार्‍यांवर पोलिसांनीच केली होती कारवाई

एमआयडीसी परिसरात एका जणाचा सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाचा व्हिडीओ तसेच फोटो व्हायरल झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळीच संबंधित वाढदिवस साजरा करण्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात आले.

वाढदिवस साजरा करणार्‍यांवर गुन्हे दाखल करणारे पोलीस, हॉटेलात पार्टी साजरा करणार्‍यांवरही गुन्हे दाखल करतीय काय? अशी अपेक्षाही सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

नियम फक्त सर्वसामान्यासाठीच का ?

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर महापालिकेसह पोलीस अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरुन कारवाई करुन दंड वसूल करत आहेत. काही दिवसांपूर्वी राजकीय पदाधिकार्‍याच्या अंत्ययात्रेला गर्दी जमल्याप्रकरणी संबंधित पदाधिकार्‍यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता काल रात्री रंगलेल्या मद्याच्या पार्टीत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा असून या संबंधितांवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे कारवाई करणार का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

जर नियम बनविणारेच नियम मोडत असतील, तर इतरांचे काय, अशाही चर्चा संबधित पोलीस अधिकार्‍याच्या सेवानिवृत्तीच्या पार्टीच्या निमित्ताने आता रंगू लागल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या