Friday, April 26, 2024
Homeनगरभागीदारीमधील फर्मचे दीड कोटी हडपले

भागीदारीमधील फर्मचे दीड कोटी हडपले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भागीदारीमध्ये स्थापन केलेल्या फर्मच्या नावे घेतलेल्या कामाची बिले परस्पर स्वत: च्या खात्यावर जमा करून एकाने शासकीय ठेकेदाराची एक कोटी 56 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

ठेकेदार शरद संभाजी ठोंबरे (वय 42 रा. तांदळी वडगाव ता. नगर, हल्ली रा. अवसरकर मळा, सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे. उदित नारायण उपाध्याय (रा. विनायकनगर, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या भागीदाराचे नाव आहे. ठोंबरे व उपाध्याय यांनी मिळून श्री सिध्दीविनायक एंटरप्रायजेस ही भागीदारीमध्ये फर्म नोंदणी केली होती. या फर्मच्या नावे बँकेत खाते उघडण्यात आले होते. तसेच ठोंबरे व उपाध्याय दोघे फर्मच्या नावे एकत्रित कामे घेऊ लागले. 19 सप्टेंबर 2019 ते 21 फेब्रुवारी 2022 दरम्यान झालेली सर्व कामांची बिले श्री सिध्दीविनायक एंटरप्रायजेस या नावाचे बँकेत असलेल्या खात्यात जमा होतील, अशी नोटरी करण्यात आली होती.

मुखेड (जि. नांदेड) येथील ग्रामपंचायतीला ऑनलाईन जोडणीची अंडरग्राऊंड केबल टाकण्याचे 99 लाखांचे काम श्री सिध्दीविनायक फर्मला मिळाले होते. त्या कामाचे 99 लाख रूपये उपाध्याय याच्या खात्यात आले होते. त्याने ठोंबरे यांना 29 लाखांचा तोंडी हिशोब दिला व 70 लाखाचा हिशोब दिला नाही. तसेच अकोले येथील कामाचे 51 लाख रुपये स्वत:च्या खात्यावर परस्पर घेतले व त्याची ठोंबरे यांना कल्पना दिली नाही. कंपनीने तिसरे काम कर्जत येथे घेतले होते. त्या कामाचे एक कोटी सात लाख रुपये भेटले होते. सदर कामाचे श्री सिध्दीविनायक फर्मच्या खात्यावर 24 लाख 62 हजार रुपये आले व इतर 47 लाख 37 हजार रुपये खर्च दाखविला व 35 लाख रुपये परस्पर उपाध्याय याने त्याच्या खात्यावर घेतले.

अशा एकूण तीन कामांचे एक कोटी 56 लाख रुपये उपाध्याय याने परस्पर स्वत:च्या खात्यावर जमा करून घेत गायब झाला आहे. त्याने ठोंबरे यांचा विश्वासघात करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या