Saturday, April 27, 2024
Homeनगरपी-वन, पी-टू आणि सशुल्क वाहनतळ कागदावरच

पी-वन, पी-टू आणि सशुल्क वाहनतळ कागदावरच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील बाजारपेठेत रस्त्यावर छोटे-मोठे साहित्य विकणारे हॉकर्स व दुकानांतून कपड्यांसह अनेक साहित्य विकणारे दुकानदार यांच्यातील संघर्ष सध्या टोकाला जाण्याच्या स्थितीत आहे. या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित केलेला ‘पी-वन व पी-टू पार्किंग आराखडा’, चार रस्ते व नऊ चौक फेरीवाला मुक्त आणि शहरात विविध 25 ठिकाणी प्रस्तावित केलेले सशुल्क वाहनतळ प्रस्ताव अजूनही कागदावरच आहेत. महापालिका, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नगर शहरात वारंवार वाहतूक ठप्प होण्याची समस्या उदभवते तसेच विक्रेत्यांसह दुकानदारांच्याही अतिक्रमणाने रस्त्याने पायी जाणे मुश्किल होत आहे.

- Advertisement -

नगरला अडीच-तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणारे राहुल द्विवेदी यांनी नगर शहरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी व वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून नऊ चौक फेरीवाले मुक्त, पाच रस्त्यांवर पी-वन आणि पी-टू तसेच शहरात विविध 25 ठिकाणी सशुल्क वाहनतळ प्रस्तावित केले होते. यासाठी नगरकरांकडून हरकती व सूचनाही मागवल्या होत्या. त्याचे नियोजन मनपाकडे दिले होते. मात्र, सुरुवातीला व्यापार्‍यांनी याला विरोध केला. त्यानंतर नागरिकांनीही यावर फारसे मत व्यक्त केले नाही.

नेहमीप्रमाणे राजकीय मंडळींचा विरोध होताच. परिणामी, हा प्रस्ताव बारगळला. मात्र, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमणे समस्या कायम राहिली. नगरमध्ये सध्या व्यापारी व हॉकर्स यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मनपा, पोलिस व जिल्हा प्रशासनानेकठोर भूमिका घेऊन फेरीवाले मुक्त चौक, पी-वन आणि पी-टू तसेच सशुल्कवाहनतळाचा बासनात गुंडाळून ठेवलेला प्रस्ताव पुन्हा वर काढणे व त्यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे झाले आहे.

पाच रस्त्यांवर वाहतूक नियोजन

वाहतूक कोंडी वारंवार होत असलेल्या शहर व उपनगरांतील पाच रस्त्यांवर पी-1 व पी-2 वाहन पार्किंग सुविधा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव होता. यात सावेडीतील भिस्तबाग चौक ते टीव्ही सेंटर हडको चौकापर्यंत, सावेडीतील पाईपलाईन रोड व गुलमोहोर रोडला जोडणारा एकवीरा चौक ते पारिजात चौक रस्ता, स्टेशन रस्त्यावरील कोठी रोड ते यश पॅलेस हॉटेल पर्यंतचा रस्ता, दिल्लीगेट जवळील नीलक्रांती चौक ते चौपाटी कारंजा आणि चितळे रस्त्यावरील नेता सुभाष चौक ते नवीपेठ-शहर सहकारी बँकेपर्यंतच्या रस्त्यावर सम-विषम तारखांना रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी आलटून पालटून पार्किंग करण्याचे यात प्रस्तावित होते. तसेच शहरात विविध कामासाठी वा खरेदीसाठी येणारांची दुचाकी व चार चाकी हलकी वाहने पार्किंग करण्यासाठी 25 ठिकाणी सशुल्क पार्किंग सुविधा करण्याचेही प्रस्तावित होते. मात्र, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या झाल्या व तिकडे मनपाचे महापौर व आयुक्तही बदलले गेले. परिणामी, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रस्तावच फायलींमध्ये अडकून गेला व अजूनही धूळखात पडून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या