Thursday, April 25, 2024
Homeजळगावऑक्सिजन व आयसीयु बेडची संख्या पोहोचली 2341 वर

ऑक्सिजन व आयसीयु बेडची संख्या पोहोचली 2341 वर

जळगाव – jalgaon

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

बाधित रुग्णांना त्वरीत उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यात 376 ऑक्सिजनयुक्त तर 59 आयसीयु बेड असे एकूण 435 बेड नव्याने तयार करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड केविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व अधिग्रहीत केलेल्या रुग्णालयातील ऑक्सिजनयुक्त बेडची संख्या 2019 तर आयसीयु बेडची संख्या 322 इतकी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत जिल्ह्यात आरोग्य पथकांच्या माध्यमातून नागरीकांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये संशयित म्हणून आढळून येणाऱ्या व्यक्ती बाधित आढळून आल्यास त्यांचेवर त्वरीत उपचार व्हावे यास प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.

याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सर्व सुविधांनीयुक्त असे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर त्वरीत उपचार व्हावेत याकरीता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून शासनामार्फत प्राप्त झालेल्या विविध निधीतून तसेच जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संसथा व लोकप्रतिनिधींच्या निधीतून मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

सुरवातीस जिल्ह्यात 1643 ऑक्सिजनयुक्त बेड तर 322 आयसीयू बेडस उपलब्ध होते. जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांचेवर उपचारासाठी अडचण येवू नये याकरीता प्रशासनाच्यावतीने बेडस वाढविण्याचा निर्णय घेतला होता. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सद्य: परिस्थितीत जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये 2019 ऑक्सिजनयुक्त बेड तर 322 आयसीयु व 234 व्हेटीलेटर बेडस उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी सांगितले.

जिल्ह्यात सर्वाधिक ऑक्सिजनयुक्त बेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 365, गोदावरी हॉस्पिटलमध्ये 300, इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात 100, सिव्हिल हॉस्पिटल, चोपडा येथे 80, रेल्वे हॉस्पिटल, भुसवाळ 64, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव 50 तर इतर शासकीय व खाजगी रुग्णालयात प्रत्येकी 5 ते 30 याप्रमाणे बेडची व्यवस्था आहे.

कोराना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत नागरीकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथके घरोघरी जाऊन तपासणी करीत आहे. या पथकांना नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या