Thursday, April 25, 2024
Homeनगरपरजिल्ह्यातून येणार्‍या जनावरांचे लसीकरण सक्तीचे

परजिल्ह्यातून येणार्‍या जनावरांचे लसीकरण सक्तीचे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लवकरच जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होणार आहेत. या ठिकाणी बाहेरच्या जिल्ह्यातील जनावरे येणार

- Advertisement -

असून लंपी स्कीन डिसीज या संसर्गजन्य आजार आणि लाळखुरकुत या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग या जनावरांचे लसीकरण सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीची सभा सभापती सुनील गडाख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सेस अंतर्गत 3 कोटी 37 लाख 41 हजार रुपयांच्या 15 योजनांना प्रशासकीय मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली आहे.

केंद्र पुरस्कृत योजना पीपीआर रोगाचे नियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत राज्य हिस्सा 6 लाख 69 हजार रुपये व केंद्र हिस्सा 1 लाख 2 हजार रुपये यांना मान्यता देण्यात आली. यात 2012 च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील 8 लाख 92 हजार शेळ्या व 3 लाख 65 हजार मेंढ्या यांना पीपीआर रोग प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात लाळखुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेत गायी- म्हशींना टॅगिंग करून रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांनी सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींना पत्र देऊन जनावरांच्या कानात शासनाचे बिल्ले मारलेले नसले (टॉगिंग) तर त्यांची खरेदी-विक्री बाजारात करू नये, याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

तसेच सभापती गडाख हे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या व साखर कारखान्यांना पत्र देऊन पशुधनाचे टॅगिंग करण्याच्या सूचना देणार आहेत. राहाता, नेवासा, शेवगाव व पारनेर तालुक्यात लंपी स्कीन डिसीज या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

ज्या गावांमध्ये आजारी जनावरे असतील त्या गावाच्या परिसरातील 5 किलो मीटरच्या आतील जनावरांना लंपी स्कीन डिसीज रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. सभेला संध्याताई आठरे, सोनाली रोहमारे, शांताबाई खैरे, दिनेश बर्डे, वंदनाताई लोखंडे, रावसाहेब कांगुणे, सुनीता आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे हे व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सहभागी झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या