शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी नोडल अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे आदेश

jalgaon-digital
2 Min Read

बँकांच्या मुख्यालयात दोन स्वतंत्र अधिकारी नेमण्याच्या सूचना

नाशिक । प्रतिनिधी

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सहाय्यभूत ठरण्यासाठी नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे येत्या बुधवार (दि.1) पासून बँकांच्या मुख्यालयांत दोन नोडल ऑफिसर्सची नेमणूक करावी असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

प्रत्येक बँकेने 2 नोडल अधिकार्‍यांची नेमणूक करावी. यातील एक अधिकारी हा कार्यकालीन कामकाज तर दुसरा अधिकारी आयटी समन्वयक म्हणून काम करेल. या अधिकार्‍यांचे नाव, फोन नंबर, ईमेल आयडी आदी माहिती दि.1जानेवारीपर्यंत सरकारकडे द्यावी, जिल्हापातळीवर जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करण्यासाठी नोडल अधिकारी नेमावा असेही या आदेशात म्हटले आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी ज्या खात्यांमधून कर्ज घेण्यात आले आहे, त्या आधारकार्ड लिंक असलेल्या आणि नसलेल्या खात्यांची स्वतंत्र माहिती देखील सरकारकडून मागवण्यात आली आहे. येत्या 7 जानेवारीपर्यंत ही माहिती पाठवावी. त्याशिवाय आधारशी न जोडलेल्या खात्यांची यादी बँकेच्या शाखेत तसेच गावच्या चावडीवर लावावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. बँकांनी आपल्या खातेदार असलेल्या ग्राहकांना फोन करून त्यांचे खाते आधारशी जोडून घ्यावे असेही सुचवण्यात आले आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये दोन लाखांपेक्षा एक रुपयाही अधिकचे थकीत कर्ज असल्यास त्या शेतकर्‍याला कर्जमाफी मिळणार नसल्याचे सरकारच्या अध्यादेशात म्हटले आहे. केवळ अल्पमुदतीच्या कर्जासाठीच ही कर्जमाफी योजना लागू होणार आहे. दि. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 हा कालावधी कर्जमाफीसाठी ग्राह्य धरण्यात आला आहे. दि. 30 सप्टेंबरपर्यंतच्या 2 लाखांच्या थकीत रकमेला कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ हा फक्त अल्पमुदतीच्या कर्जासाठी असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय कर्ज वैयक्तिक असण्याची अटही यात घालण्यात आली आहे.

शासनादेशाच्या पाचव्या कलमानुसार व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमुक्तीसाठी अपात्र करण्यात आले आहे. मागील कर्जमाफीत अशा शेतकर्‍यांसाठी एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत दीड लाखाची कर्जमाफी होती. मात्र नव्या योजनेत दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्यांना सरसकट अपात्र करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *