Thursday, April 25, 2024
Homeनगर1 लाख 51 हजार हेक्टरवर कांदा लागवड

1 लाख 51 हजार हेक्टरवर कांदा लागवड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात यंदा कांदा पिकाची विक्रमी लागवड झालेली आहे. पहिल्यांदा जिल्ह्यात 1 लाख 51 हजार 273 हेक्टरवर कांदा लागवड झाली असून हा आकडा उच्चांकी आहे. तर दुसरीकडे हळूहळ ऊस, चारा पिकांसह रब्बी हंगामाच्या पेरण्या 92 टक्क्यांपर्यंत पोहचल्या आहेत. मागील आठ दिवसांत मात्र, ऊसाची नवीन लागवड झालेली नाही.

- Advertisement -

सध्या जिल्ह्यातील शेतकरी विचित्र हवामानाचा अनुभव घेत असून दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री गारवा तर पहाटे मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. या हवामानामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रार्दभाव पडत असतांनाही शेतकर्‍यांनी कांदा पिकाला पसंती असल्याचे कांदा पिकाच्या विक्रमी लागवडीवरून दिसत आहे. जिल्ह्यात यापूर्वी 1 लाख 10 हजार हेक्टरवर कांदा पिकांच्या क्षेत्राचा उच्चांक होता. हा उच्चांक आता मोडीत निघाला आहे. याच सोबत कृषी विभागाच्या नियोजनात गव्हू पिकाचे लागवडीचे क्षेत्र सरासरी 56 हजार 863 होते. प्रत्यक्षात 83 हजार 506 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली असून त्याची टक्केवारी 147 टक्के आहे.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात नवीन ऊस लागवड झालेली नाही. मागील आठवड्यात 59 हजार 446 (58 टक्के) ऊसाची लागवड झालेली होती. त्यात वाढ झालेली नाही. कृषी विभागाने 1 लाख 2 हजार 613 हेक्टरवर ऊस लागवड प्रस्तावित केलेली असतांना ऊस लागवडीचे प्रमाण कमी दिसत आहे. हरभरा पिकाच्या पेरणीत देखील फारशी वाढ झालेली नसून 83 हजार 638 हेक्टरवर (54 टक्केच) ऊसाची लागवड झालेली आहे. उन्हाळा जवळ आलेला असून चारा पिकाचे क्षेत्र देखील वाढतांना दिसत असून जिल्ह्यात शेतकर्‍यांनी 63 हजार 578 हेक्टरवर चारा पिक घेतलेले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 7 लाख 26 हजार 292 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी 6 लाख 67 हजार 397 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असून त्याची टक्केवारी 92 टक्के आहे.

गव्हाची वाढ खुंटली

थंडीचा कडाका चांगला असतांना जिल्ह्यात अनेक ठिकाणी गव्हाची वाढ खुंटलेली दिसत आहे. मागील वर्षी देखील गव्हाच्या वाढीची समस्या शेतकर्‍यांंना जाणवली होती. ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात गहू पिकावर मावा रोगाचा प्रार्दुभाव दिसत आहे. लवकर पेरला गहू सध्या ओंबीच्या अवस्थेत आहे.

पिकनिहाय झालेली पेरणी कंसात टक्केवारी

ज्वारी 1 लाख 86 हजार 39 (39 टक्के), गहू 83 हजार 506 (147 टक्के), मका 21 हजार 169 (59 टक्के), हरभरा 83 हजार 588 (54 टक्के), करडई 62 (10 टक्के), जवस 27 (17 टक्के), ऊस लागवड 59 हजार 446 (58 टक्के), चारा पिके 63 हजार 587, कांदा 1 लाख 51 हजार 273, बटाटा 289, टोमॅटो 754, भाजीपाला पिके 12 हजार 553, मसाला पिके 223, सुगंधी औषधी वनस्पती पिके 25, फुलपिके 765 आणि फळपिके 3 हजार 927 हेक्टर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या