कोसळत्या भावाने कांदा उत्पादक हवालदिल

jalgaon-digital
2 Min Read

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

उन्हाळ कांद्याच्या (summer onion) भावात दिवसागणिक होणारी घसरण अद्याप सुरुच आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Pimpalgaon Basvant Agricultural Produce Market Committee) आवारात गावठी (उन्हाळ) कांद्याला गेल्या आठवडाभरात बाजारभावात कोणतीही भाववाढ झालेली नाही.

त्यामुळे कांद्याचे भाव (onion price) 600 ते 1500 रुपये दरम्यान राहिले तर सरासरी बाजारभाव 800 रुपयांच्या आसपास राहिले असून गोल्टी कांदा 100 ते 600 रुपये तर सरासरी 350 रु. भावाने विकला गेला. कांद्याच्या अत्यल्प दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी (farmers) हवालदिल झाले आहे. शेतकर्‍याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देणारे कांदा हे नगदी पीक असून येथील शेतकरी कांदा पिकाला सर्वाधिक प्राधान्य देत आला आहे. यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर खरीप हंगामाला सामोरे जातांना येथील शेतकर्‍यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.

येथील शेतकर्‍याच्या कांदा पिकावरील मोठ्या अपेक्षा असतात. परंतु यावर्षी कांदा पिकाने निराशा करावयाचे ठरविलेले दिसते. आज-उद्या कांद्याचे बाजारभाव वाढतील या अपेक्षेवर शेतकरी जगत आहे. उन्हाळ कांदा विक्रीसाठी बाजारात आला तेव्हा कांद्याला 1400 रुपयांच्या आसपास भाव टिकून होते. तेच बाजारभाव आठ-पंधरा दिवसात 700 ते 800 रुपयांवर आले आहेत. भारतीय बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात कांद्याला आशियायी खंडात श्रीलंका, बांगलादेशात मागणी असते. परंतु या दोन्ही देशांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने कांद्याची मागणी वाढेल असे चित्र आज तरी दिसत नाही.

कांद्याला मागणी येऊनही निर्यात केली तरी ते देश पैसे कसे चुकते करतील याबाबत शंका असल्याने व्यापारी निर्यातीकडे पाठ फिरवीत असल्याचे जाणकारांचे मत आहे. उन्हाळ कांद्याच्या दरात सतत होणार्‍या घसरणीमुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेवर दिसत आहे.

उत्पादन वाढल्याने भाव स्थिर यंदा उन्हाळ कांद्याचे उत्पादन दरवर्षाच्या प्रमाणात दीडपट झाल्याने मागणी पेक्षा पुरवठा वाढलेला आहे. सध्या उन्हाळ कांद्याला देशावर म्हणावी अशी मागणी नाही. त्यामुळे बाजारभाव स्थिर राहण्याची दाट शक्यता आहे. आज सिंगापूर, दुबई, मलेशिया या प्रमुख देशात निर्यात सुरु आहे. श्रीलंकेत मागणी असूनही व्यापारी कांदा निर्यात करण्यास फारसा उत्सुक नाही. कारण तेथील अर्थव्यवस्था फार कमकुवत झाली असल्याने निर्यात केलेल्या मालाचे पैसे मिळेल की नाही याची शंका आहे. यंदा लवकर आणि चांगला पाऊस झाला तर थोडेफार भाव वाढू शकतील.

– अतुल शाह, कांदा व्यापारी (पिंपळगाव ब.)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *