नाशकात ५ दिवसात 1 हजार खाटांची तातडीची व्यवस्था

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना बाधीताचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता महापालिका प्रशासनाकडुन तातडीने जास्तीत जास्त खाटा सज्ज ठेवण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. महापालिका क्षेत्रात आजही मोठ्या प्रमाणात खाटा शिल्लक असल्यातरी ज्या प्रमाणात रुग्ण रोज 200 च्या प्रमाणात वाढत असल्याने यादृष्टीने तयारी सुरू असुन येत्या चार पाच दिवसा शहरात नवीन 1000 खाटा रुग्णांसाठी तयार होणार आहे.

नाशिक शहरात चालु जुलै महिन्यात कोविड रुग्णांचा आकडा 4 हजारापर्यत जाणार असल्याची शक्यता शासनाकडुन वर्तविण्यात आली असुन याचा प्रत्यय गेल्या पाच दिवसात आला आहे. पाच दिवसात नऊशेच्यावर आणि 27 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

गेल्या जुन महिन्यात नवीन 2 हजार 96 रुग्णांची भर पडल्यानंतर जुलै महिन्यात दररोज सुमारे 200 या प्रमाणात रुग्णात वाढ होऊ लागली असुन दररोज पाच मृत्यु अशाप्रकारे नोंद होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडुन आता कोविड रुग्णांसाठी 3 हजाराच्यावर खाटांची व्यवस्था केली असुन हजाराच्या आसपास खाटा शिल्लक आहे.

यामुळे रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे लक्षात घेता येणार्‍या दहा दिवसानंतर खाटांची कमतरता भासु नये म्हणुन महापालिका प्रशासनाकडुन पुरेशा खाटा तयार करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे.

महापालिकेकडुन क्रेडाईच्या मदतीने ठक्कर डोम याठिकाणी 500 खाटांची व्यवस्था करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले असुन तातडीने 350 खाटांची केली जात आहे. याचबरोबर नाशिकरोड येथील मुक्तीधाम भक्त निवासस्थान ताब्यात घेऊन याठिकाणी 350 खाटांची व्यवस्था तातडीने केली जात आहे.

तसेच नवीन बिटको रुग्णालयातील 300 च्या ऐवजी 350 खाटांची तातडीचे व्यवस्था केली जात आहे. अशाप्रकारे 1 हजार 50 खाटा येत्या चार पाच दिवसात उपलब्ध होणार आहे. तसेच पुढच्या टप्प्यात आडगांव समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहात कोविड रुग्णांची व्यसस्था करण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडुन केली जात आहे.

शहरात करोना बाधीत रुग्णांच्या संंपर्कात आलेले कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडुन पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने शहरातील करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यामुळे महापालिका प्रशासन कामाला लागले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *