निळवंडे धरणाची कामे दोन वर्षात पूर्ण करणार- मुख्यमंत्री ठाकरे

नाशिक, दि. 30- अहमदनगर जिल्ह्याच्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यास राज्य शासन प्राधान्य देईल. निळवंडे धरणाची कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक अकराशे कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करण्यात येऊन येत्या दोन वर्षात ही कामे पूर्ण केली जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी अहमदनगर जिल्हा आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव एकनाथ डवले , विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यासह आमदार सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर तांबे, लहू कानडे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, श्रीमती मोनिका राजळे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सर्व लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांची माहिती घेतली. त्यांनी जिल्ह्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. निळवंडे धरण हे महत्वाचे असून तेथील कालव्यांचे काम बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे. राज्य शासनाने हे काम कऱण्यास प्राधान्य दिले असून त्यासाठी अकराशे कोटी रुपये उपलब्ध करुन देऊन दोन वर्षात कामे पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे 189 गावांतील 25 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासंदर्भात राज्यस्तरावर पुन्हा आढावा बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. यासंदर्भातील डीपीआर केंद्राकडे पाठवला आहे. त्यास मंजूरी प्राप्त करुन घेण्यासंदर्भातील पाठपुरावा कऱण्यात येत आहे, असे ते म्हणाले.अहमदनगर शहर विकासाच्या दृष्टीने एमआयडीसीच्या विस्तारीकरणाची गरज आहे. त्यानंतर परिसरात जमिनीची उपलब्धता पाहून हे विस्तारीकरण केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासंदर्भात सप्टेंबर 2018 पर्यंतचे अर्ज निकाली काढण्यात येत आहेत, नवीन अर्जासाठी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे येत्या काळात यासंदर्भातील कार्यवाही वेगवान झालेली दिसेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक आणि अहमदनगर येथील उपकेंद्र कार्यान्वित करण्यासंदर्भात मागणी आहे. याचा निर्णय एका आठवड्यात घेऊन त्याचा शासन निर्णय आठवडाभरात काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिर्डी विमानतळ अद्यावतीकरणाची मागणी आहे. तेथील नाईट लॅंडिंग आणि इमारत विस्तारीकरणासंदर्भातील निर्णय लवकर घेतला जाईल, असे ते म्हणाले. शिर्डीला येणाऱ्या भाविकांची सोय होण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

श्रीरामपूर येथे 220 केव्ही उपकेंद्र सुरु करण्याची मागणी आहे. यासंदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतला असून निविदा काढून आवश्यक कार्यवाही तात्काळ केली जाईल. येथील एमआयडीसी मध्ये आवश्यक सुविधा देण्यासंदर्भातील निर्णयही घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोपरगाव येथे न्यायालयाची इमारत 135 वर्षे जुनी आहे. तेथे नवीन इमारतीचा प्रस्ताव मागवून घेवून कार्यवाही केली जाईल, असेही श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक विभागात जाऊन जिल्हानिहाय प्रलंबित प्रश्नां संदर्भात तेथील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेऊन जे प्रश्न तत्काळ सोडवणे शक्य आहे अशा प्रश्नांवर लगेच मार्ग काढला जात आहे. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल. संवादानेच प्रश्न लवकर निकाली निघतील, असे त्यांनी नमूद केले.  विविध लोकप्रतिनिधींनी यावेळी जिल्ह्यातील प्रश्न मांडले.