Sunday, May 5, 2024
Homeनगर5 नंबर साठवण तलावाच्या 123 कोटी खर्चाला प्रकल्प मान्यता

5 नंबर साठवण तलावाच्या 123 कोटी खर्चाला प्रकल्प मान्यता

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या साठवण तलाव क्रमांक 5 साठी 123 कोटी रुपये खर्चाला प्रकल्प मान्यता मिळाली. प्रकल्प मान्यता समितीने बैठकीत एकमताने मंजुरी दिली असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिली.

- Advertisement -

आ. आशुतोष काळे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहरातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच दोनच महिन्यांत 5 नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम सुरू करून दाखविले. शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी 5 नंबर साठवण तलाव मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे पुढील कामासाठी तांत्रिक मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करून 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 123 कोटी रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी देखील मिळविली होती.

या मंजुरीला प्रशासकीय मंजुरी मिळवून निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. आशुतोष काळे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याची नगरविकास विभागाने दखल घेऊन नुकतीच त्याबाबत नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई येथे प्रकल्प मान्यता समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पाच नंबर साठवण तलावाच्या 123 कोटी रुपये निधीला प्रकल्प मान्यता समितीने एकमताने मंजुरी दिली आहे. यावेळी आ.आशुतोष काळे स्वतः जातीने या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यासमवेत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक गावडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नंदनवारे,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सहसचिव पांडुरंग जाधव, नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी आदी उपस्थित होते.

पाच नंबर साठवण तलावाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळवून पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरू होणार असल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 2019 ची विधानसभा निवडणूक पार पडताच 6 जानेवारी 2020 ला प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम सुरू करून 2020 या वर्षाची झोकात सुरुवात केली व 2022 ला देखील प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत पाच नंबर साठवण तलावाला एकमताने 123 कोटी रुपयांची मंजुरी मिळवत कोपरगाव शहरवासियांना आ. आशुतोष काळे यांच्याकडून नवीन वर्षाची भेट देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या