Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकदुशिंगपूर तलावातील समुद्धीच्या रखडलेल्या कामाला सुरुवात; आमदार कोकाटे यांनी हमी घेतल्याने शेतकऱ्यांचा विरोध...

दुशिंगपूर तलावातील समुद्धीच्या रखडलेल्या कामाला सुरुवात; आमदार कोकाटे यांनी हमी घेतल्याने शेतकऱ्यांचा विरोध मावळला

सिन्नर । अजित देसाई 

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला तालुक्यातील दुशिंगपूर येथील शेतकऱ्यांचा विरोध मावळला असून साठवण बंधाऱ्यातील गेले दोन वर्षे रखडलेले काम सुरु करण्यात आले आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांनी या शेतकऱ्यांच्या अडचणी मार्गी लावण्याची हमी घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी महामार्गाच्या कामाला परवानगी दिली आहे.

- Advertisement -

समृद्धी महामार्ग दुशिंगपूर येथील साठवण तलावाच्या मध्यातून जाणार असल्याने या तलावाची साठवण क्षमता घटेल  भीती शेतकरी व ग्रामस्थांनी व्यक्त करत तलावातून होणाऱ्या कामाला विरोध केला होता.

तलावातून जाणारा सुमारे एक अंतराचा समृद्धी मार्ग बनवताना संपूर्ण लांबीचा उड्डाणपूल बांधावा अशी मागणी या शेततकऱ्यांची होती. त्यामुळे अनेकदा कामासाठी आलेल्या दिलीप बिल्डकॉनच्या अधिकऱ्यांसह एमएसआरडीसी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील स्थानिकांचे वाद झाले होते.

तलावातून केवळ ९० मीटर लांबीचा पूल असेल. हा पूल तलावात येणाऱ्या मुख्य नाल्याच्या प्रवाहमार्गावर बांधण्यात येईल असे कंपनी व प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. या पुलाव्यतिरिक्त तलावातून जाणारा संपूर्ण मार्ग मातीचा भराव टाकून उभारण्यात येणार होता. यामुळे तलावाची साठवण क्षमता कमी होईल तसेच शेतकऱ्यांना महामार्ग ओलांडून गावातून शेतांकडे जाणे गैरसोयीचे राहील असे सांगत ग्रामस्थ देखील ठाम विरोधात होते.

याशिवाय तलावासाठी जमिनी देणाऱ्या काही शेतकऱ्यांचे वाढीव मोबदल्याचे दावे देखील गेली ३०-४० वर्षे प्रलंबित आहेत.  हे दावे निकाली काढण्याची मागणी देखील या निमित्ताने करण्यात येत होती.

शेतकरी विरोधावर ठाम असल्याने एमएसआरडीसीकडून आमदार कोकाटे यांना तोडगा काढून देण्याची विनंती करण्यात आली होती. तर शेतकरी देखील आमच्या अडचणी सुटल्या तर विरोधाचा प्रश्न नाही अशी भूमिका कोकाटे यांच्याकडे मांडत होते. अधिकारी व शेतकरी प्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन आ. कोकाटे यांनी समृद्धी प्रश्नी पर्याय सुचवत त्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.

त्यानुसार तलावातून जाणाऱ्या मार्गामुळे साठवण क्षमता घटणार नाही याची हमी प्रशासनाने घेतली. तलावात बांधण्यात येणाऱ्या पुलाची लांबी ९० मीटरवरून २१० मीटर एवढी करण्यात आली. तांत्रिक बाजू तपासत तलावात भराव टाकताना कमी होणारी साठवण क्षमता खोलीकरणाच्या माध्यमातून वाढवण्यात येईल याची हमी मिळाल्यावर आमदार कोकाटे यांनी दोन दिवसांपूर्वी तलावाच्या ठिकाणी समक्ष येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

तलावाची जागा सरकारी असल्याने विरोध करून अडचणी वाढवू नका. मोबदल्याशी संबंधित असणारे प्रश्न मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवतो. इतर अडचणी असतील तर त्या थेट मला सांगा, परंतु कामात आडवे येऊ नका असा सल्ला कोकाटे यांनी दिल्यावर शेतकऱ्यांचा विरोध देखील मावळला.

त्यानंतर लगेचच एमएसआरडीसीचे प्रभारी कार्यकारी अभियंता (समृद्धी प्रकल्प) डी.के. देसाई, उपकार्यकारी अभियंता एन.के. बोरसे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता व्ही.डी. पाटील, दिलीप बिल्डकॉनचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मनिष मिश्रा, जनसंपर्क अधिकारी सुनिलसिंग तोमर, कचरू घोटेकर, रामनाथ ढमाले, चंद्रभान गोराणे, डॉ. विजय शिंदे, विठ्ठल उगले, विजय काटे, अण्णासाहेब कहांडळ, कानिफनाथ काळे, कानिफनाथ घोटेकर यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

तलावाची साठवणक्षमता वाढवणे फायद्याचे 

सिन्नरच्या पूर्व भागातील दुशिंगपूरचा तलाव सर्वात मोठा असून तो भोजपुर धरणातील पूरपाण्याने भरून घेण्याचे नियोजन आहे. मात्र, गेली कित्येक वर्षे प्रयत्न करूनदेखील या पाण्याचा लाभ मिळालेला नाही. संगमनेर तालुक्यातील पळसखेडे पासून थेट बंदिस्त चारी बनवून पाणी थेट या तलावात आणण्याची आपली योजना असून येत्या अधिवेशनात त्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात येईल.

सिमेंट पाईप वापरून पाण्याची गळती व चोरी रोखली जाऊन निऱ्हाळे पासून चारीवरील सर्व बंधारे भरून घेण्याची हि योजना आहे. याशिवाय कुंदेवाडी येथून देवनदीचे पूरपाणी देखील दुशिंगपूर, सायाळेपर्यंत नेण्यात येणार असून काम सुरु झाले आहे.

दुशिंगपूर साठी दोन ठिकाणांवरून पूर पाणी मिळणार असल्याने तलावाची साठवणक्षमता वाढणे फायद्याचे राहिला. समृद्धीच्या कामामुळे हि साठवणक्षमता वाढली तर फायदा परिसरातील शेतीला होईल हि बाब आमदार कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या