Friday, April 26, 2024
Homeनाशिकवासोळ येथे आढळले स्त्री जातीचे अर्भक

वासोळ येथे आढळले स्त्री जातीचे अर्भक

वासोळ | वार्ताहर

आईच्या नात्याला काळा फासणारी घटना आज देवळा तालुक्यातील वासोळ येथे घडली. नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला साडीच्या कपड्यांमध्ये गुंडाळून येथील गल्लीत असलेल्या मुडक्या झोपडीत फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला…

- Advertisement -

आज (दि.१४) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

वासोळ येथील आदिवासी वस्तीत नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक सापडले असून बाळाचा जन्म रात्रीच्या सुमारास झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

बाळाच्या रडण्यामुळे तेथील नागरिकांचे लक्ष गेल्याने बाळाचे प्राण वाचले आहेत.पोलिस पाटील कैलास खैरनार व तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन ते बेवारस अर्भक उपचारासाठी वासोळ येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात आणण्यात आले.

उपकेंद्राचे आरोग्य सेवक डॉ. महेश सुर्यवंशी व आरोग्य सेविका वंदना बच्छाव यांनी अर्भकावर प्राथमिक उपचार केले. मात्र त्याच्या डाव्या पायाच्या पंजाला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत देवळा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून मुलाची लालसा असणाऱ्या परिवाराने मुलगी नको म्हणून अर्भक फेकले असावे, असा कयास नागरिकांमध्ये लावला जात आहे.

वासोळ येथील आदिवासी वस्तीत स्त्री जातीचे नवजात बालक बेवारस स्थितीत आढळून आले. पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांना प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन बालकाला प्राथमिक आरोग्य वर्धनी उपकेंद्रात उपचारासाठी आणले. आम्ही त्या बालकावर उपचार केले असून त्याच्या डाव्या पायाला गंभीर इजा झाल्याने पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डॉ. महेश सुर्यवंशी, आरोग्य सेवक, आरोग्य वर्धनी उपकेंद्र वासोळ

- Advertisment -

ताज्या बातम्या