Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून भगवतीचा जागर

आजपासून भगवतीचा जागर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यशक्तिपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर आज पासून (दि.26) देवी भगवतीचा जागर सुरू होत आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत गडावर नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. 8 आणि 9 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा केला जाईल. आदिमायेचे मूर्तीस्वरुप संवर्धन करण्यासाठी 21 जुलैपासून सप्तशृंगीदेवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. दोन महिन्यानंतर उद्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला आदिमायेच्या स्वयंभू नवरुपाचे दर्शन भाविकांना होणार आहे. देवीच्या नवरुपाचे दर्शन घेण्याची आस भाविकांना लागली आहे.

- Advertisement -

आज गडावर सुरू होणार्‍या नवरात्रोत्सवात देवीच्या नवरूपाचे दर्शन भाविकांना होणार आहे. यात्रा काळात गरजेच्या सर्व सुविधांची तयारी करण्यात आली आहे.नांदुरी ते सप्तशृंगी गड रस्ता नवरात्रोत्सव खासगी वाहतुकीस बंद राहाणार असून फक्त राज्य परिवहन महामंडळाचे बसेस भाविक प्रवाशांची वाहतूक करतील. परंतु बाहेर डेपोतून येणार्‍या बसेस या फक्त नांदुरी वाहन तळापर्यंतच राहणार असून तेथून सप्तशृंग गडावर जाण्यासाठी भाविकांना बस बदलावी लागणार आहे.

आरोग्य यंत्रणेने गडावरील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ट्रस्ट दवाखाना, रामटप्पा आदी ठिकाणाबरोबरच बसस्थानक पायी रस्त्यावर प्राथमिक उपचार केंद्र उभे राहणार आहे. या ठिकाणी भाविकांसाठी उपचार केंद्र उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. सप्तशृंगी गडावरील व नांदुरी येथील स्थानिक दुकानदार यांच्यामध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे. करोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये गडावरील ग्रामस्थांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे यावेळेस तरी आई भगवतीने कुठल्याही प्रकारचे संकट न येता भाविकांना व गडावरील ग्रामस्थांना नवरात्र उत्सव व कोजागिरी पौर्णिमा आनंदात जावी अशी आई भगवतीकडे गडावरील ग्रामस्थ प्रार्थना करत आहे. सप्तशृंगी आई भगवतीला येणार्‍या भाविकांसाठी पेन्युकुलर रोपेवे ट्रॉलीची सुविधा असल्यामुळे भाविक मंदिरात जाण्यासाठी रोप-वे ला पसंती देत असतात, यामध्ये सुद्धा वेटिंग हॉल, पाणी, सुलभ शौचालय व सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत.

श्रीक्षेत्र सप्तशृंगीगड या ठिकाणी गडावरती येणार्‍या भाविकांकडून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, याकरीता पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने वाढीव पोलीस दल तसेच गडावर येणार्‍या भाविकांकडून वन विभागाच्या हद्दीत अनुसूचित प्रकार घडणार नाही. त्याची खबरदारी घेण्यासाठी वन विभागाच्या वतीने 24 तास वनविभाग कर्मचारी उपस्थित राहणार आहे. सप्तशृंगी गडावर व नांदुरी येथिल नांदुरी ग्रामपंचायतीच्या वतीने वाहन तळावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी यात्रा उत्सव काळात मद्य दारु किंवा कुठल्याही प्रकारचे अवैद्य धंदे होणार नाही, याची सुद्धा खबरदारी पोलीस यंत्रणा मार्फत घेण्यात येणार आहे.

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांच्या वतीने सप्तशृंंगी गडावर येणार्‍या भाविकांसाठी भोजनालय व जागोजागी पिण्याचे पाण्याची व्यवस्था डॉक्टर उपलब्ध करण्यात येणार आहे. नांदुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत खासगी वाहन पार्किंची व्यवस्था करण्यात आली असुन यासाठी जवळजवळ 120 खासगी कर्मचार्‍यांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात येणार असून खाजगी वाहनतळासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीने दर वसुली होणार आहे. परंतु यंदा नवरात्रोत्सवास मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा अंदाज आहे.

गर्दी वाढल्यास कळवणकडे जाणारी वाहतूक किंवा नाशिक कडे जाणारी वाहतूक ही अभोणा मार्गाने नांदुरीहून वळविली जाते, परंतु नांदुरी अभोणा रस्त्यावरतर मोठ्या प्रामाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून मागील आठवड्यात एका वळणावर ट्रक व ट्रक्टर पलटी झाला असुन हा रस्ता फक्त एकेरी वाहतुकीसाठीचा आहे. त्यात जर ही वाहतूक या मार्गाने वळविली तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊन अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. तरी अजून ही सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता सुधारण्यासाठी वेळ आहे. या अगोदर खड्ड्यामंध्ये फक्त बारीक दगडं टाकले असून यामुळे या रस्त्यावर सर्वत्र बारीक दगडांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबतीत या रस्त्यावर वाहतूक करणारे वाहनधारक आधीच त्रस्त झाले आहे. एकंदरीत सर्व विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी नवरात्र उत्सव व्यवस्थित पार पाडावा यासाठी तयारी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या