Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील शाळांमध्ये आज 'राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण'

जिल्ह्यातील शाळांमध्ये आज ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील एकूण 231 शाळांमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाअंतर्गत National Achievement Survey आज शुक्रवारी चाचणी घेण्यात येत आहे. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या मिळून 7,562 विद्यार्थ्यांचा या सर्वेक्षणात समावेश असून यासाठी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहण्याची दक्षता घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) State Council for Educational Research Training शाळांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. यापूर्वी 2017-2018 मध्ये तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे तीन वर्षांनी पुन्हा हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा सकाळी साडेसात वाजता सुरू करण्यात येणार आहेत. एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा. बाके उपलब्ध नसल्यास स्वच्छ चटई वापरून पुरेसे अंतर राखण्यात यावे. चाचणीसाठी निवडलेल्या शाळेचे माध्यम आणि इयत्तानिहाय वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असल्यास सर्व तुकड्यांतील विद्यार्थी उपस्थित असावेत.

या विद्यार्थ्यांतून एक तुकडी यादृच्छिक पद्धतीने क्षेत्रीत अन्वेषकांमार्फत निवडली जाईल. संपादणूक चाचणी सोडवण्यासाठी तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी साडेदहा ते बारा, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी साडेदहा ते साडेबारा अशी वेळ देण्यात आली आहे. सर्वेक्षणातील शाळांतील माध्यमनिहाय, इयत्तानिहाय शिकवणारे सर्व विषयांचे शिक्षक शाळेत उपस्थित असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण National Achievement Survey

विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीतील संपादणुकीचे मूल्यांकन करणे, देशातील शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन पातळ्यांवर ही सर्वेक्षण चाचणी घेतली जाते. सर्वेक्षणातील शाळा यादृच्छिक नमुना (रँडम सॅम्पलिंग) पद्धतीने निवडण्यात आल्या आहेत. हे सर्वेक्षण देशभरात एकाच दिवशी होणार आहे.

महत्त्वाच्या सूचना

विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येताना काळ्या-निळ्या रंगाचे किमान 2 बॉल पॉईंट पेन सोबत ठेवावे तसेच शाळांनीसुद्धा काही प्रमाणात पेन शिल्लक ठेवावे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता भासल्यास शाळा मुख्याध्यापक यांनी क्षेत्रीय अन्वेषक आणि निरीक्षक यांच्याशी सल्लामसलत करून लेखनिक उपलब्ध करून द्यावा.

इयत्ता 3 रीच्या विद्यार्थ्यांना जचठ पद्धतीची सवय नसल्याने त्यांचे सर्व जचठ शिट हे क्षेत्रीय अन्वेषक भरून देतील.

चाचणी वेळी कोणतीही अडचण, समस्या उद्भवल्यास जिल्ह्याच्या प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा नोडल अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी निरीक्षक

सर्वेक्षणासाठी राज्यातील तिसरीच्या 1 हजार 631, पाचवीच्या 1 हजार 559, आठवीच्या 2 हजार 641 आणि दहावीच्या 2 हजार 801 अशा सर्व जिल्ह्यांतील एकूण 7 हजार 330 शासकीय, खासगी अनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या मिळून 2 लाख 34 हजार 55 विद्यार्थ्यांची चाचणी होईल.चाचणीमध्ये भाषा, गणित, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, विज्ञान या विषयांच्या चार प्रश्नसंचात 47 प्रश्न समाविष्ट असतील. सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी स्वतंत्र निरीक्षक म्हणून काम करणार आहेत.

इयत्तानिहाय शाळा आणि विद्यार्थी

इयता 3- शाळा 49 – विद्यार्थी 1328

इयता 5- शाळा 45 – विद्यार्थी 1298

इयता 8- शाळा 78 – विद्यार्थी 2281

इयता 10- शाळा 90- विद्यार्थी 2655

.

- Advertisment -

ताज्या बातम्या