Saturday, April 27, 2024
Homeनाशिकएकच चर्चा; गट, गण कुठे, कसे अन् किती?

एकच चर्चा; गट, गण कुठे, कसे अन् किती?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीच्या (Panchayat samiti) गट गणांच्या संख्येत वाढ होणार हे आता निश्चित आहे. मात्र, ही वाढ नेमकी कोणत्या तालुक्यात किती आणि कशा जागा वाढतील? याबाबत काहीच स्पष्ट नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे….

- Advertisement -

गट,गण निश्चिती झाले तरी आरक्षणाचे काय होणार? यावर पुढील निवडणुकीचे राजकारण अवलंबुन राहणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि विद्यमान सदस्यांमध्ये खलबते सुरू झाली आहेत.

जिल्हा परिषद गटांची सदस्य संख्या कमित कमी 9 तर जास्तीत जास्त 12 पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या वाढणार असली तरी नेमकी कोणत्या तालुक्यात किती जागा वाढतील?

याचा अंदाज प्रत्येक जण आपापल्या परीने लावत आहे. निफाड तालुक्यातील ओझर गट कमी होत असला तरी अजून दोन जागा वाढू शकतात. त्यामुळे या तालुक्यातील गटांची संख्या 11 वर पोहोचेल.

तर इगतपुरी, बागलाण, सिन्नर, नाशिक, चांदवड, येवला, पेठ, दिंडोरी, सुरगाणा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक ते दोन गटांची निर्मिती होईल, अशी शक्यता आहे. नांदगाव तालुक्यात जातेगाव हा गट गत पंचवार्षिक निवडणुकीतच अस्तित्वात आल्याने या ताल्युक्यात नव्याने गट निर्माण होणार नाही,अशी शक्यता आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातही नवीन गट निर्माण होईल, अशी परिस्थिती नाही. कळवण तालुक्यात सध्या चार गट आहेत. कनाशी गटाची निवडणूक नितीन पवार हे आमदार झाल्यानंतर दोन वर्षांपासून झालेली नसून ही जागा रिक्त आहे.

गट व गण नव्याने निर्माण होणार असल्याने त्यासाठी निवडणूक विभागाला आता काहीसा वेळ लागणार आहे. गटांची रचना झाल्याशिवाय आरक्षणाचा निर्णय निश्चित होणार नाही. गटांची रचना झाल्यावर त्यावर हरकती मागवाव्या लागतील.

या हरकती निकाली काढून निवडणूका फेब्रुवारीमध्ये घेणे शक्य होईल का? याविषयी सदस्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणुकांना उशिर होण्याचीही शक्यता बळावली आहे. पुढील दोन महिन्यातील घडामोडी महत्वपूर्ण ठरणार आहेत.

…तर आरक्षण ‘पाणी’ फिरवणार?

जिल्ह्यात गटांची संख्या वाढणार असली तरी नवीन गट नेमका कुठे व जसा निर्माण होईल, याचे आराखडे विद्यमान सदस्यांसह इच्छुक बांधत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा गट निर्माण होईल, त्या गटाला आरक्षणाची पार्श्वभूमी नसेल.

त्यामुळे या गटात कोणते आरक्षण निघते? याकडे इच्छुकांचेे लक्ष लागून आहे. आपल्याला सोईचा ठरणारा गट निर्माण झाला तरी आरक्षणाने त्यावर ‘पाणी’ फिरवायला नको. त्यामुळे एक तर गटाची निर्मिती आणि त्यानंतर आरक्षण सोडत यावरच इच्छुकांचे सर्व समीकरण अवलंबुन राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या