Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगBlog : नाशिकच्या पर्यटनाला नवी उभारी!

Blog : नाशिकच्या पर्यटनाला नवी उभारी!

नाशिक | एन. व्ही. निकाळे

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिकमधील ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोटक्लब प्रकल्पाचे ई-लोकार्पण जागतिक पर्यटनदिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले. गंगापूर धरण परिसरात 14॥ हेक्टर क्षेत्रावर उभ्या राहिलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन प्रकल्पांचा श्रीगणेशा सात वर्षांपूर्वी झाला होता.

- Advertisement -

त्याच्या उद्घाटनाला 2020 साल उजाडले. येणार्‍या पर्यटकांसाठी हे प्रकल्प आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरू शकतील. नाशकात समुद्रकिनारा नसला तरी गंगापूर धरण परिसरात बोटीतून जलविहार अनुभवण्याची मौज बोटक्लबवर पर्यटकांना मिळू शकेल. अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या या देखण्या प्रकल्पांची भर शासनाच्या कृपेने नाशिकच्या पर्यटनात घातली गेली आहे.

‘करोना’ महामारीने सारेच व्यवहार प्रभावित झाले व बहुतेक ठप्पही झाले. पर्यटन क्षेत्र त्याला अपवाद नाही. सुरक्षित अंतर, मुसके (मास्क), स्वच्छोदकाचा (सॅनिटायझर) वापर, गर्दी टाळणे या चतु:सूत्रीचा अवलंब प्रत्येकाने काटेकोरपणे करणे अपेक्षित आहे.

गड-किल्ले, नदीकाठ, धबधबे, समुद्र किनारे आदी सर्व पर्यटनस्थळांवर सध्या शुकशुकाट आहे. पर्यटन ठप्प असले तरी यंदाचा जागतिक पर्यटनदिन महाराष्ट्रासाठी, विशेषत: नाशिक जिल्ह्यासाठी लाभदायी ठरला. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या दोन मनोवेधक पर्यटन संकुलांचे ई-लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नाशिकचे एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट, बोटक्लब आणि नवी मुंबईतील खारघरच्या ‘एमटीडीसी रेसिडन्सी’चा त्यात समावेश आहे.

गंगापूर धरण परिसरात 14॥ हेक्टर क्षेत्रावर वैशिष्ट्यपूर्ण ग्रेप पार्क रिसॉर्ट प्रकल्प तयार करण्यात आला आहे. 4 टुमदार जुळी घरे (ट्विन व्हिला), 28 कक्षांचे सुसज्ज पर्यटक विश्रामगृह उभे राहिले आहे. त्यात उपाहारगृह, जलतरण तलाव, सभागृह, स्वागतकक्ष, प्रतीक्षाकक्ष आदी मूलभूत सुविधा आहेत. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य म्हणून नावारुपास आणण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी लोकार्पणावेळी केला. नाशिकच्या पर्यटन प्रकल्पाचा श्रीगणेशा सात वर्षांपूर्वी झाला होता. दरम्यानच्या बदललेल्या राजवटीने उपेक्षा केल्यामुळे त्याच्या उद्घाटनाला 2020 साल उजाडले. नाशिकच्या पर्यटनात एका देखण्या प्रकल्पाची भर शासनाच्या कृपेने घातली गेली आहे.

नाशकात आठवड्याच्या सुटीतील (विकएंड) पर्यटन वाढावे या हेतूने ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोटक्लब प्रकल्प साकारण्याचा संकल्प तत्कालीन सरकारने केला होता. प्रकल्पाची मुहूर्तमेढ आघाडी सरकारच्या कारकिर्दीत रोवली गेली.

राज्यातील सत्तांतरानंतर मात्र प्रकल्पाची बरीच रखडपट्टी झाली. काम पूर्णत्वास जाऊन त्याचे उद्घाटन महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत झाले हा योगायोग नव्हेच! राज्याचे तत्कालीन पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आता पुन्हा पालकमंत्री झाले आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून हा प्रकल्प प्रत्यक्ष उभा राहिला. मधल्या पंचवार्षिक काळात नाशिकचे पालककत्व तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारले होते. नाशिक विकासाच्या राणाभीमसेनी गर्जनासुद्धा केल्या होत्या.

तथापि नाशिकच्या शिरपेचात चार चांद लावणार्‍या पर्यटन प्रकल्पांना गती देण्याबाबत पालकांनी आपुलकी दाखवल्याचे नाशिककरांना आढळले नाही. बोटक्लबसाठी 40 बोटी आणल्या गेल्या होत्या. त्यापैकी काही बोटी सारंगखेड्यातील महोत्सवाची शोभा वाढवण्यासाठी ‘पाहुण्या’ म्हणून नेण्यात आल्या. बोटक्लबच्या उद्घाटनाआधी त्या बोटी नाशकात परतल्या का?

ते मात्र समजू शकलेले नाही. सध्याचे वातावरण पर्यटनास अनुकूल आणि सुरक्षित नाही. ‘करोना’ कहर संपुष्टात येऊन सगळे व्यवहार सुरळीत झाल्यावर नाशिकचे पर्यटन पुन्हा गजबजू लागेल. येणार्‍या पर्यटकांसाठी ग्रेप पार्क रिसॉर्ट आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरू शकेल. नाशकात समुद्रकिनारा नसला तरी गंगापूर धरण परिसरात बोटीतून जलविहार अनुभवण्याची मौज बोटक्लबवर पर्यटकांना मिळू शकेल.

नाशिकचे हवामान सुखद, आल्हाददायक आणि हवेहवेसे आहे. त्यामुळे जुन्या काळापासून नाशकात मुक्काम ठोकण्याचा वा नाशिकचे रहिवासी होण्याचा मोह आजवर अनेकांना आवरता आलेला नाही. जागतिक तापमानवाढ अथवा हवामान बदलाच्या जोरदार चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर झडत आहेत. तथापि नाशिकच्या वातावरणात त्याचा प्रभाव जाणवत नाही. येथील तापमान आजही उत्साहवर्धक आहे.

‘द्राक्षनगरी’ (ग्रेपसिटी) म्हणून नाशिक जगप्रसिद्ध आहे. ग्रेप पार्क रिसॉर्टमुळे द्राक्ष पर्यटनासोबतच नाशिकची वाईन आणि वाईनरी पर्यटकांत लोकप्रिय करण्यासाठी मदतच होईल. नाशिक शहर व जिल्ह्याचा पर्यटन विकास आणि अर्थकारणाला गती मिळेल. बोटक्लबचे लोकार्पण झाले तरी पर्यटकांसाठी तो अजून खुला झालेला नाही.

एवढ्यात खुले होईल असेही वाटत नाही. बोटक्लब सुरू होईल तेव्हा राज्यातील तो अव्वल दर्जाचा पर्यटन प्रकल्प ठरेल, असा विश्वास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. प्रकल्पाची मुहूर्तमेढ पालकमंत्री म्हणून रोवून त्याचे उद्घाटनही पालकमंत्री म्हणूनच करण्यात भुजबळ यशस्वी ठरले आहेत. यासोबत जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांच्या विकासाच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत.

इगतपुरीत हिल स्टेशन, दादासाहेब फाळके चित्रपटनगरी, संत निवृत्तीनाथ देवस्थान विकास आराखडा, सप्तशृंगीगड विकास आराखडा, भावली धरण पर्यटन विकास, नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, येवला तालुक्यातील ममदापूरचे हरणांच्या अभयारण्याचे वनपर्यटन क्षेत्र आदी अनेक विकास योजनांना गती देण्याचे सूतोवाच पालकमंत्र्यांनी केले आहे.

पर्यटन विकास करताना पर्यटनस्थळी पोहोचण्याची, तेथे राहण्या-खाण्याची उत्तम व्यवस्था असली पाहिजे, याकरता पर्यटनाचे स्वतंत्र पुडके (पॅकेज) तयार करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली ती महत्त्वपूर्ण आहे. मात्र मध्यमवर्गीय पर्यटकांनाही परवडू शकेल, असे किफायतशीर पुडके (पॅकेज) कशा प्रकारे उपलब्ध करता येईल यावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने लक्ष पुरवले तर खूप बरे होईल.

नाशिकच्या ‘ग्रेप पार्क रिसॉर्ट’मध्ये चैनीच्या सोयी-सुविधा केल्याचे सांगण्यात आले आहे. शहरे आणि पर्यटनस्थळांवरील सरकारी विश्रामगृहांप्रमाणे हा प्रकल्प केवळ मंत्रीगण, नेतेमंडळी, उच्चपदस्थ किंवा मुंबई-पुणे अथवा परराज्यांतून येणार्‍या अतिमहत्त्वाच्या पाहुण्यांपुरता मर्यादित राहील का?

अशी भीती पर्यटनाबद्दल आस्था असणारे काही नागरिक व्यक्त करीत आहेत. सामान्य माणसांनाही तेथे एखाद-दोन दिवस जाऊन तेथील पर्यटनाचा आनंद उपभोण्याची संधी त्यांच्या खिशाला परवडणार्‍या दरात कशी देता येईल याबाबतही पर्यटन विकास महामंडळ संवेदनशील राहील, अशी आशा करावी का? ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोटक्लब प्रकल्प साकारले खरे, पण जरा विलंबाने! यापुढचे पर्यटन प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते निर्धारित काळात पूर्णत्वास जातील, अशी आशा जिल्ह्यातील जनतेने बाळगणे गैर ठरू नये.

नाशिकप्रमाणे जिल्ह्यात पर्यटनयोग्य स्थळांची रेलचेल आहे. आख्खा जिल्हाच पर्यटन क्षेत्र व्हावा एवढी विविधता जिल्ह्याला लाभली आहे. रस्ता, रेल्वे मार्गाने देशाशी उत्तम प्रकारे जोडले गेलेले नाशिक हवाईमार्गाच्या बाबतीत मात्र अद्याप दुर्लक्षित का राहावे? हा प्रश्नही हवाईयात्रेला प्राधान्य देणारे पर्यटक करीत असतात.

दळणवळणासाठी नाशिक सुलभ आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, सुरत, बडोदा, इंदूर आदी प्रमुख शहरांतील नागरिकांचा शिक्षण, नोकरी, व्यवसाय वा उद्योगानिमित्ताने नाशकात सतत राबता असतो. तसेच पर्यटकांची, विशेषत: भाविकांची येथे सतत वर्दळ सुरू असते. जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांवर विकासकामे केल्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी भाषणात केला. याशिवाय जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत.

त्यांचे जतन करण्यासोबत तेथे पर्यटकांचा ओघ वाढावा म्हणून भोजन-निवास आदी किमान सोयी-सुविधा किल्ल्यांच्या परिसरात करता येतील.

जिल्हा आणि राज्यातील पर्यटन वाढावे म्हणून राज्य, देश आणि जागतिक पातळीवर त्याबाबतच्या प्रसिद्धीवर भर द्यायला हवा. अन्यथा विकासकामे होऊनही पर्यटक आले नाहीत तर त्यामागील हेतू साध्य कसा होणार?

[email protected]

- Advertisment -

ताज्या बातम्या