Friday, April 26, 2024
Homeनाशिक'तौक्ते' चक्रीवादळापासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी; हेल्पलाईन जारी

‘तौक्ते’ चक्रीवादळापासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी; हेल्पलाईन जारी

नाशिक | प्रतिनिधी

अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात दिनांक 14 व 15 मे रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटसह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर दिनांक 16 व 17 मे रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यात वर्तविण्यात आलेली आहे…

- Advertisement -

त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा व गुजराथ राज्याच्या तटवर्ती भागात याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.

दिनांक 15 मे 2021 रोजी अरबी समुद्रातील ‘ताऊते’ या चक्रीवादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दिनांक 16 मे 2021 रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर 50 ते 70 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दिनांक 17 मे 2021 रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर 50 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

चक्रीवादळादरम्यान विजा चमकणार असल्याने अशी घ्या काळजी

1.विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.

2.दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा.

3.विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

4.घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

5.विजेच्या खांबांपासून लांब रहावे.

6.विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.

7.विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास , गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.

8.धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

चक्रीवादळ कालावधीत वाहणारा सोसाट्याचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षांत घेवून नागरिकांनी पुढीलप्रमाणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे –

1. मुसळधार पावसात व सोसाट्याच्या वा-यात घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस व वारा थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.

2.अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत व सोसाट्याचा वारा वाहत असताना सुरक्षित ठिकाणी राहा व प्रवास करू नका.

3.पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

4. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष: 02532317151

मनपा नाशिक: 02532222413 किंवा टोल फ्री 1077 ला संपर्क करावा.

5. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.

6. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष 02532317151 किंवा टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.

7. आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आपण राहत असल्यास अतिवृष्टीच्या कालावधीत आपण जागरूक रहावे व प्रशासनास सहकार्य करावे.

8. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किंवा तुरळक पावसामुळे शेत मालाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी व शेतमाल सुरक्षित स्थळी ठेवावा.

पाळीव प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी तयार करण्यात आलेले शेडची दुरुस्ती व वाऱ्यामुळे शेडचे पत्रे उडू नये यासाठी दक्षता घ्यावी.

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या बाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

9. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये.

10.मुसळधार पाऊस पडत असताना तसेच सोसाट्याचा वारा वाहत असताना कोणीही पर्यटन स्थळी, नदी-नाले इ. ठिकाणी जावू नये.

11. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.

12. हवामान विभागाकडून, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करून जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या