Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनांदगावमधील चव्हाण हत्याकांडाचा अखेर उलगडा

नांदगावमधील चव्हाण हत्याकांडाचा अखेर उलगडा

नांदगाव । Nandgoan

नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात ऑगस्ट २०२० मध्ये घडलेल्या चव्हाण कुटुंबीय हत्याकांडाचा उलगडा झाला असून ग्रामीण पोलीसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली.

- Advertisement -

नांदगावमधील वाखारी-जेऊर रस्त्यालगत वाखारी शिवारात आण्णा पुंजाराम चव्हाण यांच्या शेतातील घरासमोरील ओट्यावर झोपलेला त्यांचा मुलगा समाधान आण्णा चव्हाण (35), सून भारती समाधान चव्हाण (26), नात आराध्या समाधान चव्हाण (7) आणि नातू अनिरूध्द समाधान चव्हाण (5) यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या मान, डोके व हातावर वार करून खून केल्याची घटना ऑगस्ट 2020 मध्ये घडली होती.

यासंदर्भात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेबाबत पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी यांनी सविस्तर माहिती घेऊन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यासाठी ठिकठिकाणी शोध पथक पाठवण्यात आली.

चौकशीदरम्यान सचिन उर्फ धर्मा सखाहरी चव्हाण ( रा. पढेगाव, ता. कोपरगाव), सचिन विरूपण भोसले ( रा.शिरोडी,जि. औरंगाबाद) माणि संदीप महेंद्र चव्हाण ( रा. केडगाव, जि. अहमदनगर) हे त्रिकूट संशयास्पद वागत असल्याच्या माहितीवरून पोलीसांनी गोपनीय माहितीचे संकलन सुरू केले.

तपासाची सुत्रे वेगाने फिरल्यानंतर संशयित संदीप महेंद्र चव्हाण यास शिताफीने अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीवरून त्याच्यासह त्याच्या साथीदारांनी चैनीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने चोरी करून खून केल्याची कबुली दिली.

हे सर्व संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. सदर गुन्ह्याचा छडा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, पोउनि संजयकुमार सोने, रविंद्रकुमार शिलावट, राजेंद्र वानखेडे आदींच्या पथकाने लावण्यात यश मिळवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या