Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनगर राष्ट्रवादीत सत्ता भिनली !

नगर राष्ट्रवादीत सत्ता भिनली !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सत्तेसोबत येणार्‍या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून निर्माण होणार्‍या धुसफूसीची वात राष्ट्रवादीतही पेटली आहे.

- Advertisement -

‘एका पदाधिकार्‍याविरोधात अनेक’ असा सामना सुरू झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कानावर जिल्हा राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी आपली नाराजी घातली आहे. यावर उपाय न सापडल्यास दिवाळीआधीच पक्षात नाराजीचे फटाके फुटणार की नाराजीचा हा बार फुसका ठरणार, याचा अंदाज पक्षवर्तुळात बांधला जात आहे.

नगर शिवसेनेतील नाराजीनाट्य लक्षवेधी ठरले. त्यापाठोपाठ सत्ताधारी राष्ट्रवादीतही पक्षसंघटनेतील कामकाजावरून नाराजी वाढीस लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांचा करिष्मा चालला. त्याचा फायदा पक्षाला नगर जिल्ह्यातही झाला.

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आले. त्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत हत्तीचे बळ संचारले. ‘माझ्याच कार्यकाळात पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली’, असा दावा एक पदाधिकारी विधानसभा निकालानंतर वारंवार करू लागला. यात तांत्रिकदृष्ट्या तथ्य असले, तरी पक्ष आणि नेतृत्व याची ताकद मोठी होती. या यशानंतर या पदाधिकार्‍याने सर्वांना सोबत घेऊन चालण्याऐवजी ‘एकला चलो रे’ सुरू झाले. यातूनच निर्माण झालेली नाराजी काही महिन्यांपासून वाढली.

ऐन दिवाळीच्या तोंडावर या नाराजीची वात पेटवून देण्याचे काम गुरूवारी जिल्ह्यातील काही नेते आणि आजी-माजी आमदारांनी केले. जिल्ह्यातील ओल्या दुष्काळाच्या दौर्‍यावर आलेले पालकमंत्री मुश्रीफ यांना पक्षातील नेत्यांचे शिष्टमंडळ भेटले. यावेळी त्यांनी पक्षसंघटनेतील या पदाधिकार्‍याच्या कामकाजावर आक्षेप घेतला.

पक्षातील अन्य पदाधिकारी आणि नेत्यांविरोधात खासगीत बोलणे, पक्षात गटा-तटाचे वातावरण निर्माण होईल, अशी कृती करणे यासह अन्य ठपके संबंधीत पदाधिकार्‍यावर ठेवण्यात आले. यांना पदावर ठेवले तर पक्षात उभी फूट पडले, असा इशाराच या नेत्यांनी पालकमंत्र्यांना दिला. मंत्री मुश्रीफ यांनी देखील शांतपणे सर्व गार्‍हाणी ऐकून घेतली. याबाबत ते खा. शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. या पदाधिकार्‍याला समज देवून हा विषय संपतो की चिघळतो, याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

ताळमेळाचा अभाव

राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आल्यापासून जिल्हा राष्ट्रवादी व पक्षांतर्गत आघाड्यांमध्ये ताळमेळचा अभाव आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास राष्ट्रवादीमध्ये गटा-तटाचा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पक्षाकडून आता संघटनात्मक आणि आणखी काही बदल करण्याची गरज असल्याची अपेक्षा पक्षाच्या एका मोठ्या नेत्याने व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या