Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनगर : काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

नगर : काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

अहमदनगर | Ahmednagar

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांसाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने एमआयडीसीमध्ये कामगारांची स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू असून स्वाक्षरी मोहिमेला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

या प्रसंगी कामगारांना संबोधित करताना काळे म्हणाले की, कामगारांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानकपणे थेट कामावरून काढून टाकण्याची मुभा केंद्र सरकारने केलेल्या नवीन कामगार कायद्यांमध्ये भांडवलदारांना देण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांवर अचानकपणे बेरोजगार होण्याची नामुष्की निर्माण झाली आहे. पूर्वी २० कामगार जरी असले तरी त्यांना कामावरून काढण्यापूर्वी सरकारकडे तसा प्रस्ताव देत मान्यता घ्यावी लागायची. आता ३०० कामगार संख्या असणाऱ्या कंपन्यांना कोणताही प्रस्ताव न देता व पूर्वपरवानगी न घेता कामगारांना कामावरून काढून टाकण्याची मुभा नवीन कायद्याप्रमाणे देण्‍यात आली असल्याबद्दल काळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

या कायद्यांना काँग्रेस आणि कामगारांचा तीव्र विरोध आहे. काँग्रेस कार्यकर्ते प्रत्यक्ष कामगारांमध्ये जात त्यांना हा विषय समजावून सांगत त्यांच्या सहभागातून ही मोहीम राबवत आहेत. याला कामगारांचा प्रचंड प्रतिसाद आहे. प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम नगर शहरासह संबंध जिल्ह्यामध्ये सुरू असून शहरांमध्ये कामगार आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम राबवली जात आहे. या स्वाक्षरी मोहीम मध्ये काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, प्रवीण गीते, चिरंजीव गाढवे, मुबिन शेख, देवेंद्र कडू, वाहिदभाई शेख, इमरान बागवान, अमित भांड, विशाल कळमकर, प्रमोद अबुज, प्रशांत जाधव, योगेश काळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

१७,५०० कामगारांनी केल्या स्वाक्षऱ्या, ३०,००० चे उद्दिष्ट

या अभियानाची सुरुवात आ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर काँग्रेसचे केली होती. सुरुवातीला १०,००० स्वाक्षऱ्या संकलित करण्याचे उद्दिष्ट ठरवलेले होते. परंतु कामगारांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आज पर्यंत १७,५०० कामगारांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. एकूण ३०,००० कामगारांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्याचे लक्ष शहर काँग्रेसने निश्चित केले असल्याचे काळे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या