Friday, April 26, 2024
Homeनगरनांदुर्खीच्या दाम्पत्याने साडेसात लाखाचे ब्रेसलेट केले परत

नांदुर्खीच्या दाम्पत्याने साडेसात लाखाचे ब्रेसलेट केले परत

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरालगतच्या निघोज येथील बाजार समितीचे संचालक शरद काशिनाथ मते शिर्डीकडे येत असताना निमगाव कोर्‍हाळे गावात नगर-मनमाड रोडवर हातात असलेले सोन्याचे 13 तोळे वजनाचे साडेसात लाख रुपये किंमतीचे ब्रेसलेट हातातून पडले. त्याचा शोध देखील घेतला. त्याचा नाद देखील सोडून दिला. मात्र नांदुर्खी येथील वारकरी संप्रदायाचे साईभक्त तात्याबा कारभारी चौधरी व सौ. गयाबाई या दाम्पत्याने ते परत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

- Advertisement -

शेतकरी असलेले हे कुटुंब मोपेडवरून लग्नासाठी गेले होते. परत शिर्डीकडे येताना त्यांनी मते यांच्या हातातील वस्तू पडलेली बघितली. आवाज देखील दिला. पण लक्षात न आल्याने शरद मते हे पुढे निघून गेले. हे कुटुंब आपल्या घरी गेले. शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला असता विना नंबरची भगवा झेंडा असलेली दुचाकी सीसी टिव्हीमध्ये दिसत होती.

सायंकाळी लक्षात आल्यावर या वस्तीवर जाऊन घटना सांगताच या महिलेने लाखोंचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे ओळख पटवून परतही दिले. रोख रक्कम बक्षीस देऊन नविन कपडे घेऊन या वयोवृद्धांचा सत्कार देखील साई सेवा उद्योग समूहाचे संचालक संपतराव मते यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रामाणिकपणाबद्दल अनेकांनी कौतुक केले असून तात्याबा चौधरी हे बाबुराव चौधरी यांचे बंधू तर प्रगतिशील शेतकरी नंदू व जालिंदर चौधरी यांचे वडील आहेत.

सोन्यापेक्षा प्रामाणिकपणा मोठा आहे. साडेसात लाखांचे ब्रेसलेट हे वारकरी संप्रदायात गळ्यातील तुळसीमाळेपेक्षा मोठे होऊच शकत नाही यावर आमची श्रद्धा आहे. या अगोदरही सोने सापडले पण प्रामाणिकपणे परत दिले आहे.

– तात्याबा चौधरी, साईभक्त नादुर्खी

- Advertisment -

ताज्या बातम्या