Wednesday, April 24, 2024
Homeनगर2014ची ‘ऑफर’ आज फायदेशीर ठरली असती

2014ची ‘ऑफर’ आज फायदेशीर ठरली असती

ना. बाळासाहेब थोरात : मंत्रिमंडळ विस्तारानंतर संस्थान व महामंडळांचा निर्णय

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेली विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर नाकारली. मात्र त्यावेळेस विरोधी पक्षनेतेपद घ्यायला हवे होते. आता त्याचा आज मला जास्त फायदा झाला असता, असे प्रतिपादन राज्याचे महाआघाडीचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीत केले. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिर्डीसह अन्य संस्थान व महामंडळांचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

ना. बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी ना. थोरात यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, लोकसभेनंतर मोठी पदे घेतलेले अनेक बडे नेते पक्ष सोडून गेले. तरूण नेत्यांनी ती जागा भरून काढली आणि पक्षाला विजय मिळवून दिला. जे सोडून गेले त्यांना आता दुःख होत आहे. त्यांना पश्चाताप झाला असून चुकल्यासारखे वाटत आहे. पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा संधी द्यायची की नाही याचा निर्णय पक्षातील तरूण नेत्यांना विचारूनच घ्यावा लागेल, असा टोला ना.थोरात यांनी लगावला.

शेतकरी कर्जमाफीबाबत ना.थोरात म्हणाले, राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा मागविण्यात आला आहे. जास्तीत जास्त मदत राज्यातील शेतकर्‍यांना करण्याचा आमचा प्रामाणिक हेतू आहे. महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ विस्तारानंतर साई संस्थान तसेच महामंडळ वाटपाचा निर्णय होणार आहे. राजकीय मतांतरे राज्यघटनेने स्वीकारली आहेत. सरकारमधील घटक पक्षांचा राज्यघटनेवर पूर्ण विश्वास असून घटनेच्या तत्त्वाने पुढे जाणार आहोत. साईबाबा सर्वधर्म समभावाचे प्रतीक असून श्रद्धास्थान आहे. सर्वांवर त्यांचे आशीर्वाद आहे, असे आपण मानतो. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. त्याचा चांगला उपयोग व्हावा आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, अशी साईचरणी प्रार्थना केली असल्याचे ना. थोरात यांनी सांगितले.

याप्रसंगी ना. थोरात यांचा साईबाबा संस्थानच्यावतीने उपमुख्यकार्यकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी खा. सदाशिव लोखंडे, श्रीरामपूरचे आ. लहू कानडे, पदवीधर मतदार संघाचे आ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, अशोक खांबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वर्पे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, संदीप सोनवणे, सुधाकर शिंदे, राकेश कोते, अमित शेळके, दीपक गोंदकर, विशाल कोते, अभिषेक शेळके, अमोल बानाईत, प्रकाश गोंदकर, समीर शेख आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

राहाता तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना नेते कमलाकर कोते, राहाता नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, तालुकाप्रमुख संजय शिंदे उपजिल्हाप्रमुख अनिल बांगर, अक्षय तळेकर, राहुल गोंदकर, अमोल गायके, अनिल पवार, महेश महाले, महेंद्र कोते, चंद्रकांत गायकवाड आदीसह शिवसैनिकांनी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर ना. बाळासाहेब थोरात यांचा पुष्पगुच्छ शाल पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार केला. नांदुर्खी येथे ना. बाळासाहेब थोरात यांचा सत्कार शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय काळे, शिवाजी चौधरी, गणेश सोमवंशी, अमोल खापटे, सुनील परदेशी, नानक सावंत्रे, संभाजीराव नांगरे, संतोष वाके आदींसह शिवसैनिकांनी सत्कार केला.

लवकरच विस्तार
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून त्यावर आज किंवा उद्या अंतिम निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असून त्या बाबतीत लवकर निर्णय होईल. तीन घटक मित्रपक्ष एकत्र आहोत. यामध्ये सर्वांना समान न्याय असावा व सर्वांना काम करण्याची समान संधी असावी, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे ना. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या