Wednesday, May 8, 2024
Homeनाशिकदादांच्या निर्णयाने मुस्लिम नेते संभ्रमात

दादांच्या निर्णयाने मुस्लिम नेते संभ्रमात

नाशिक । फारूक पठाण Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-शिवसेना युती शासनाला पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासह 9 मंत्र्यांनीदेखील शपथ घेतली. त्यात नाशिकचे दिग्गज नेते माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश असल्यामुळे नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मुस्लीम नेते सध्या संभ्रमावस्थेत दिसून येत आहेत. शरद पवारांना साथ दिली तर भुजबळ नाराज होतील व भुजबळ-अजितदादांबरोबर गेले तर भाजपसोबत जाण्यासारखे होईल. त्यामुळे मतदारसंघात त्याचा परिणाम होण्याची भीती असल्याने सध्या तरी अनेक नेते दोन्ही राष्ट्रवादीपासून दूर असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

1999 साली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेस पासून फारकत घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर ते नाशिक दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी काही नेत्यांच्या घरी हजेरी लावली होती. त्यात मुस्लिम नेत्यांच्या घरीदेखील ते गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक मुस्लिम नेत्यांनी काम केले आहे. सध्या जुने नाशिकमधील प्रभाग 14 मध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असून डझनभर नेते व शेकडो कार्यकर्ते पक्षात काम करीत होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मात्र काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी वेगळी भूमिका घेऊन भाजप-शिवसेना युती सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षप्रमुख शरद पवार यांनी फुटीनंतर नाशिक दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी येवला मतदारसंघात सभा घेतली. त्या ठिकाणी जाताना नाशिक शहरात शक्तीप्रदर्शन केले होते. त्यांच्या दौर्‍यापूर्वी राष्ट्रवादी भवन काबीज करण्यासाठी दोन्ही गटाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र कार्यालय मुंबईनाका भागात नव्याने बांधण्यात आले आहे.

जुने राष्ट्रवादी भवन अजित पवार गटाकडे गेले आहे. त्यावेळी शरद पवारांच्या स्वागताला मोजकेच मुस्लिम नेते हजर होते. काही माजी नगरसेवकांनी तेथे जाणे टाळले होते, अशी चर्चा आहे. अजित पवारांनीदेखील नाशिकमध्ये येऊन शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळीसुद्धा अनेक मुस्लिम नेते गैरहजर दिसून आले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाशिकवर मजबूत पकड आहे. राष्ट्रवादीत काम करणारे नेते थेट त्यांच्या संपर्कात होते. मात्र अजितदादांसोबत भुजबळ गेल्यामुळे व भाजप-शिवसेना सरकारला पाठिंबा दिल्यामुळे काही अल्पसंख्याक नेत्यांची एक प्रकारे कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

अनेक नेत्यांनी कोणत्या नेत्यासोबत जायचे याबाबत निर्णय घेतला नसल्याचे समजते. भुजबळ यांच्यासोबत राहिले तर एक प्रकारे भाजपसोबत त्यांना काम करावे लागेल. मुस्लिमबहुल भागात भाजपला पाहिजे तसे मतदान होत नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. सेक्युलर पक्ष म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर राहिले तर छगन भुजबळ नाराज होतील. त्यामुळे माजी लोकप्रतिनिधी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सध्या शांत राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा तसेच नाशिक महापालिका निवडणूक होणार आहेत. त्यात मुस्लिम नेते काय निर्णय घेतात ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

काँग्रेस-ठाकरे गटाचे पारडे जड होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे दोन गट निर्माण झाले आहे. एकाने भाजप- शिवसेना बरोबर जाणे पसंत केले आहे तर दुसर्‍या गटाने महाविकास आघाडीतच राहणे पसंत केले आहे, मात्र संभ्रम अवस्थेत सापडलेले काही मुस्लिम नेत्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटाकडे जाण्याचा कल दाखवला आहे, काँग्रेसलादेखील ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या