Thursday, April 25, 2024
Homeनगरमुरकुटे-ससाणे ‘सहमती एक्सप्रेस’ पालिका निवडणुकीतही धावणार?

मुरकुटे-ससाणे ‘सहमती एक्सप्रेस’ पालिका निवडणुकीतही धावणार?

अशोक गाडेकर

श्रीरामपूर –

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यात धावलेली मुरकुटे-ससाणे गटाची युती आगामी नगरपालिका

निवडणुकीत धावणार का? असा सवाल या दोन्ही गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.

श्रीरामपूर तालुक्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहणारांमध्ये माजी मंत्री स्व. गोविंदराव आदिक, माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांची नावे तसेच आदिक-मुरकुटे-ससाणे यांच्यातील संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो. त्यात कधी आदिक-ससाणेंनी एकत्र येवून मुरकुटेंना टार्गेट केले तर कधी ससाणे-मुरकुटेंनी एकत्र येवून आदिकांना विरोध केला. तर श्रीरामपूर नगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीत आदिक-मुरकुटे यांनी एकत्र येवून ससाणेंना विरोध केला. राजकारणात कोणीही कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो तसा तो मित्रही निसतो. हे श्रीरामपूरकरांनी अनेकदा अनुभवले आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव होण्यापूर्वी ससाणे- मुरकुटे यांच्यातील संघर्ष टोकाचा होता. अशोक साखर कारखाना सर्वसाधारण सभेच्या निमित्तांने पेटलेल्या वादात अनेक कार्यकर्त्यांची डोके फुटली. काहींना जेलची हवा खावी लागली. त्यात निवडणूक आली की नेते मंडळी वेळोवेळी आपल्या सोयीचे राजकारण करत असल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले.

‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ या भूमिकेतून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी गेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी मंत्री स्व. गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधाताई आदिक यांना मानस कन्या संबोधत खंबीर साथ दिली. एवढेच नव्हे तर नगराध्यक्षपदाबरोबरच पालिकेची सत्ता बहाल केली. यात राजकारणातील शत्रू ससाणे यांना सत्तेतून पायउतार केल्याचे मुरकुटे यांचे समाधान मात्र फार काळ टिकले नाही. पालिकेच्या कारभारावरून आदिकांशी मतभेद झाल्याने मुरकुटे यांनी आदिकांना विरोध करण्याची भूमिका घेतली. त्यात पारंपारिक विरोधक मानल्या जाणार्‍या ससाणे गटाबाबतचा विरोध दुर्लक्षीत झाला, तरीही तो संपलेला नव्हता. त्यानंतरच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी उमेदवारांसाठी द्यावयाची पक्षाचे एबी फॉर्म आपल्या ताब्यात मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्य माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची कोंडी केली. त्यामुळे आदिक- मुरकुटे वादात आणखी भर पाडली. त्यानंतरच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुरकुटे यांनी लोकसभेला काँग्रेसच्या तर विधानसभेला शिवसेनेच्या उमेदवारास मदत करून ससाणे विरोध जिवंत ठेवला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवड णूक बिनविरोध करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेला साथ देत मुरकुटे व ससाणे यांनी राजकीय संघर्ष बाजूला ठेवून एकमेकांविरोधात दाखल केलेले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने माजी आमदार भानुदास मुरकुटे व उपनगराध्यक्ष करण ससाणे बँकेच्या संचालक मंडळात बिनविरोध विराजमान झाले. या दोन्ही नेत्यांच्या विजयाचा आनंद ससाणे समर्थकांच्या आगाशे कट्ट्यावर दोघांच्याही समर्थकांनी एकत्रीत साजरा केला.एवढेच श्रीरामपूरच्या भवितव्यासाठी मुरकुटे व ससाणे यांनी एकत्र यावे अशी अपेक्षाही व्यक्त केली. येत्या डिसेंबर महिन्यात श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतीली मुरकुटे- ससाणे सहमती एक्सप्रेस पालिका निवडणुकीतही धावणार का ? याची उत्सुकाता या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांबरोबरच श्रीरामपूरकरांना लागली आहे.

विखेंची टॉनिक कुणाला मिळणार!

श्रीरामपूरच्या राजकारणात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका एक चर्चेचा विषय ठरते. काँग्रेस पक्षात असताना ससाणे गटासोबत असलेल्या विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ससाणे यांच्या विरोधात भूमिका घेतली. हा पक्षीय राजकारणाचा भाग असला तरी ससाणे विरोधकांना त्यांनी दिलेली पक्षविरहित ताकद दुर्लक्षून चालणार नाही. अर्थात श्रीरामपूर पालिकेच्या गेल्या निवडणुकीत व त्यानंतरच्या घडामोडीतही विखे यांची भूमिका ‘किंगमेकर’ची होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत विखेंचे टॉनिक कुणाला मिळणार ? याबाबतही उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या