Wednesday, April 24, 2024
Homeनगर17 महिन्यांत आढळले 49 मुन्नाभाई डॉक्टर

17 महिन्यांत आढळले 49 मुन्नाभाई डॉक्टर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात एप्रिल 2021 पासून आतापर्यंत 49 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. यातील 33 जणांविरोधात वेगवेगळ्या तालुक्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून 21 जणांविरोधात न्यायालयात खटले सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. दरम्यान, पाथर्डी तालुक्यात आढळून आलेल्या बोगस डॉक्टरमुळे जिल्ह्यातील मुन्नाभाईंचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायिक यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर जिल्हा परिषद तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत आहे. संबंधीत तालुक्यात आढळणार्‍या बोगस डॉक्टर यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम तालुकास्तरावर असणार्‍या पथकांवर सोपवण्यात आलेले आहे. तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या यांच्या स्तरावर जिल्ह्याची समिती आहे. ही समिती दर महिन्यांला बोगस डॉक्टर आणि त्यांच्यावर होणार्‍या कारवाईचा आढावा घेते.

या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, सहाय्यक संचालक कुष्ठरोग, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरिक्षक, यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी हे सदस्य आहेत. या जिल्हास्तरीय समितीची नुकतीच बैठक झाली असून यात जिल्ह्यातील विद्यामान स्थितीतील बोगस डॉक्टर यांच्यावर करण्यात आलेली कारवाई, दाखल गुन्हे आणि सुरू असलेल्या खटल्यांबाबत माहिती देण्यात आली.

दरम्यान, शेजारच्या बीड जिल्ह्यातील एका बोगस मुन्नाभाई पाथर्डी तालुक्यात येवून माणसांवर उपचार करत असल्याचे समोर आले. संबंधीत बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, असाच प्रकार जिल्ह्यात अन्यत्र होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने पुन्हा महिनाभर मोहिम राबवून मुन्नाभाई यांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

बोगस डॉक्टर अन् कंसात कारवाई केलेले

नगर 1(1), राहता 13 (6), कोपरगाव 2 (2), संगमनेर 2 (1), अकोले 5 (0), पारनेर 8 (8), श्रीगोंदा 8 (8), शेवगाव 5 (2), पाथर्डी 5 (5) असे आहेत. तर जामखेड, कर्जत, श्रीरामपूर, राहुरी आणि नेवासा तालुक्यात एकही बोगस डॉक्टर नसल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे.

जिल्ह्यातच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टर यांच्यावर लक्ष्य ठेवण्यात येत असून आढळून येणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून महिनभरात जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोधू त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

– डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या