Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा निवडणूक लोकसभा, विधानसभेनंतर?

मनपा निवडणूक लोकसभा, विधानसभेनंतर?

नाशिक । फारूक पठाण Nashik

जवळपास शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष झाले आहे, मात्र या वर्षभराच्या काळात राज्यातील मुंबई महापालिकेसह सुमारे 18 महापालिकांच्या निवडणुका तसेच जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका घोषित झाल्या नाही. विरोधक सतत निवडणूक घेण्याची मागणी करीत असले तरी निवडणुका घेण्यात आल्या नाही, तर आता देशात लोकसभा तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे नाशिक महापालिकेची निवडणूक या दोन्ही निवडणुकांनंतर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी दिसून येत आहे तर सोशल मीडियावर पूर्वीसारखी इच्छुकांची गर्दीही दिसत नाही.

- Advertisement -

13 मार्च 2022 रोजी नाशिक नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकीय राजवटीला प्रारंभ झाला. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत नाशिककरांनी भारतीय जनता पक्षाचे 66 नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने पहिले अडीच वर्षे रंजना भानसी तर दुसरे अडीच वर्षे ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी यांना पक्षाचे वतीने महापौर होण्याची संधी मिळाली. कुलकर्णी यांच्या काळात नाशिक शहराच्या विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले, तर कुलकर्णी यांनी महापौर असताना केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा करून विविध प्रकल्प नाशिकला आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारने नमामि गोदा प्रकल्पाला सुमारे 1823 कोटी रुपयांची तत्वता मंजुरी दिलेली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्या कामाचे भूमिपूजन देखील झाले आहे.

त्याचप्रमाणे भव्य लॉजिस्टिक पार्क, आयटी हब तसेच शहरातील महापालिकेच्या भूखंडांचा बीओटी तत्त्वावर विकास असे अनेक योजना कुलकर्णी यांनी अमलात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे भाजपच्या काळातील अशा विविध कामांना एक प्रकारे ब्रेक लागल्याचे दिसून आले होते. महाविकास आघाडीचे सरकार मागच्या वर्षी जूनमध्ये कोसळले तर राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे झाले आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. तरी युती सरकार सत्तेवर आल्याने नाशिकमधील महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे होताना दिसत नाही.

एक वर्ष होत आले तरी नाशिक शहराच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे प्रकल्प साईडलाईनला पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकमधील आमदारांपैकी एकाला मंत्रीपद मिळावे, अशी मागणी भाजपकडून होत आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मध्य नाशिकचे आ. देवयानी फरांदे यांच्यासह राहुल ढिकले, सीमा हिरे, राहुल आहेर यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे नाशिक महापालिका निवडणूक आता लोकसभा व विधानसभा निवडणूक नंतरच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून महापालिकेने सुरू केलेल्या कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे दिसत आहे.

जागावाटप डोकेदुखीचे ठरणार

राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा तसेच नाशिक महापालिकेची निवडणूक युती म्हणून आम्ही लढणार असल्याचा दावा नेत्यांकडून होत आहे, मात्र आगामी काळातील निवडणुकांमध्ये जागा वाटप एक मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने आतापासूनच नाशिक लोकसभेवर आपला दावा ठोकला आहे तर युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे. सेनेचे विद्यमान खासदार हे मागील दोन टर्मपासून सतत निवडून येत आहे. तर धुळे मतदारसंघ ज्यामध्ये मालेगावचा समावेश आहे. ही जागा युतीमध्ये भाजपकडे आहे, मात्र त्या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते आविष्कार भुसे हे लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेना सोडणार का व भाजप मालेगावची जागा सोडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या