मुळा नदीपात्रातील कोरड्या बंधार्‍यात पाणी सोडा

jalgaon-digital
1 Min Read

वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्यातील व नेवासा तालुक्यातील या दोन तालुक्याच्या मध्यभागांमधून मुळा नदी वाहत आहे.

मात्र, नदीपात्र सध्या कोरडे पडले आहे. तसेच या मुळा नदीवर पाच केटीवेअर बंधारे असून ते बंधारे भरून देण्याची मागणी राहुरीच्या पूर्वभागातील शेतकर्‍यांनी केली आहे.

नदीपात्रातील कोरडे बंधारे अखेरची घटका पाण्यावाचून मोजीत आहेत. यामध्ये डिग्रस, मानोरी, मांजरी, अमळनेर, पाचेगाव हे बंधारे आहेत. मुळा धरणात जवळपास सोळा ते सतरा टीएमसी पाणी शिल्लक आहे. या बंधार्‍यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरडे बंधारे आणि कोरडे नदीपात्रामुळे नेवासा व राहुरी तालुक्याच्या नदीकाठावरील शेतकर्‍यांवर पाणी देता का पाणी? म्हणण्याची वेळ आली आहे. तसेच शासनाचे या बंधार्‍यासाठी काही कोटी रुपये खर्च झालेला आहे.

शेतकर्‍यांना पावसाळ्यामध्ये पाणी मिळते. मात्र, उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा ऊस लागवडीसाठी व खोडव्यासाठी संपूर्ण खर्च वाया जातो. पिके जळालेली शेतकर्‍यांना डोळ्यादेखत पहावे लागते. त्यामुळे मुळा नदीवरील बंधारे भरून मिळावे, अशी मागणी शेतकरी संतोष खुळे, वळण सोसायटीचे माजी चेअरमन मुकिंदा काळे, काकासाहेब आढाव, प्रकाश चोथे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पिंपरीचे जालिंदर काळे, संजय पवार, मांजरी येथील आशिष बिडगर, पांडूकाका जगताप, बाबासाहेब कारले आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *