शरद पवारांचा डोक्यावर ‘वरदहस्त’ म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री – डॉ. अमोल कोल्हे

jalgaon-digital
2 Min Read

पुणे (प्रतिनिधि) / Pune – शरद पवार साहेबांचा वरदहस्त डोक्यावर आहे, म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदारांना काही काम नसल्यामुळे वाद, भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम ते करत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केली आहे.

शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी स्थापन केली. पण या आघाडीत धुसपूस सुरु आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबाळाचा नारा दिला त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली असताना आता डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना आणि आढळराव पाटील यांना टार्गेट केले आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन आज (शनिवार) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे कालच (शुक्रवार) शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. हा रस्ता आपण मंजूर केला असून, आपणच याचं भूमीपूजन केलं होतं. अमोल कोल्हे केवळ शो बाजी करत आहेत, असा दावा आढळरावांनी केला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याचे उद्‌घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

खेड घाटातील बायपासचे काम बंद पडले होते. त्यावेळी आपण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज अखेर बाह्यवळणाचे काम झालं आहे. अशा वेळी अचानक उद्घाटन करण्याचा घाट खासदार कोल्हे यांनी घातला. या कामासाठी कुठलेच योगदान नसताना त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत, असा आरोप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

त्यावर खासदार कोल्हे म्हणाले की, शरद पवार साहेबांचा वरदहस्त डोक्यावर आहे, म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे याचा विचार श्रेयासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. माजी खासदारांना काही काम नसल्यामुळे वाद, भांडणे लावण्याचे व श्रेय घेण्याचे काम ते करत आहे.

दरम्यान, यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या कामासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी प्रयत्न केले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा माजी खासदार आढळराव पाटील यांचा फोटो रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकेवर नसल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. दरम्यान संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसह आढळराव पाटील यांनी शुक्रवारीच खेड आणि नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले. यावरून अमोल कोल्हे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *