Thursday, April 25, 2024
Homeनगरमराठा आरक्षणाचा लढा हा सर्व पातळीवर लढणार - आ. विखे

मराठा आरक्षणाचा लढा हा सर्व पातळीवर लढणार – आ. विखे

अकोले |प्रतिनिधी| Akole

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत भाजप मराठा समाजाच्या सर्व संघटनाबरोबर असून महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अजूनही पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही. राज्यसरकार याबाबत उदासीन असल्याचे सांगून भाजप मराठा आरक्षणाच्या प्रश्नांबाबत मराठा समाजाला बरोबर घेऊन सर्व पातळीवर लढा देणार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या प्रश्ना बाबत विचार विनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी अकोले महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहामध्ये तालुक्यातील विविध मराठा समाजाच्या समन्वयक व भाजप च्या निवडक कार्यकर्त्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विखे पाटिल बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड होते.

यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, जिल्हा संघटक नितीन दिनकर, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी आंबरे, जि. प.सदस्य कैलासराव वाकचौरे, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब गोडसे, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, शहराध्यक्ष सचिन शेटे, हितेश कुंभार, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, विजय सारडा, परशराम शेळके, रावसाहेब वालुंज, गोरक्ष मालुंजकर, मंगल जाधव, अंजनाताई बोंबले, उद्योजक राजेंद्र गोडसे, अमोल वैद्य, अनिल नाइकवाड़ी, रमेश नाइकवाड़ी, अर्जुन गोडसे, वाल्मीक देशमुख, नाजिम शेख, आर्किटेक्ट चेतन नाइकवाड़ी, संदीप दातखिले, सुशांत वाकचौरे, राजाराम वाकचौरे, विकास वाकचौरे, दीपक वैद्य, प्रतीक वाकचौरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

आ. विखे पा. म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत 56 मोर्चे काढण्यात आले, काही हुतात्मे झाले, त्याचा त्रास भाजप सरकारलाही झाला. मराठा आरक्षणाची अनेक वर्षाची मागणी भाजप सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात टिकेल या पद्धतीने मांडली होती. मात्र सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार असून त्यांचा वेळ एकमेकांची मनधरणी करण्यात जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्ना बाबत ते उदासीन असल्याने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले आहेत. व त्यांच्या या नाकर्तेपणा मुळे आरक्षण गमवावे लागले. त्यांनी घाई मध्ये आर्थिक दुर्बल घटकासाठी 10 टक्के आरक्षण लागू केले मात्र ते आरक्षण केंद्र सरकारने या पूर्वीच लागू केलेले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी ते केंद्र सरकारवर आरोप करीत आहे. आपण सर्वांनी चांगल्या सूचना केल्या असून त्यांचा उपयोग पुढील दिशा ठरविताना विचारात घेऊ असे म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. वसंतराव मनकर, भाजपचे जि प गटनेते जालिंदर वाकचौरे, महिला आघाडी च्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षा सौ. सोनालीताई नाईकवाडी, शिवसेनेचे माधवराव तिटमे, मराठा महासंघचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे, संभाजी ब्रिगेडचे सुरेश नवले, भाजप महीला आघाडी च्या सौ. रेश्मा गोडसे यांनी आपली मनोगते व्यक्त करताना मराठा आरक्षण प्रश्नाबाबत आम्ही आपल्यासोबत आहोत, यामध्ये राजकारण आणू नये, राज्य सरकार वर विसंबून न राहता केंद्र सरकरकडेही पाठपुरावा करावा, आक्रमक व कठोर भूमिका घ्यावी, तात्पुरते आरक्षण नको, कायमस्वरूपी द्या, आपण पालकत्वाची भूमिका घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, बहुजन नेत्यांनी खेकड्याची वृत्ती सोडून देऊन या प्रश्नावर एकत्र बसा, अशा सूचना केल्या.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड हे आग्रही होते, त्यांनी पहिली स्वाक्षरी केली. तालुक्यातील मराठा आरक्षण लढ्यात माजी मंत्री पिचड व त्यावेळी आमदार असलेले वैभवराव पिचड यांनी नेहमीच पुढाकार घेतला.प्रसंगी सरकारच्या विरोधातही ते उतरले. त्यांनी प्रत्येक मराठा आरक्षण आंदोलनाला सक्रिय पाठींबा दिलेला आहे.

– जालिंदर वाकचौरे, जि. प. गटनेते

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर पिचड आणि विखे पहिल्यांदाच एकत्र आले. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचा वाढदिवस लक्षात ठेवून आ. विखे यांनी बैठक सुरू होण्यापूर्वीच केलेला सत्कार सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

- Advertisment -

ताज्या बातम्या