Friday, April 26, 2024
Homeनगरआ. लहामटे यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मूकमोर्चा

आ. लहामटे यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मूकमोर्चा

अकोले |प्रतिनिधी| Akole

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असून असे कोणतेही षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही,

- Advertisement -

असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी यांनी दिला.

तालुक्यातील खडकी येथे ग्रामपंचायत शिपाई रामदास लखा बांडे यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात आ. लहामटे यांचे विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सत्ताधारी व विरोधी कार्यकर्त्यांमध्ये जुगलबंदी सुरू होती.

आ. डॉ. लहामटे यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला होता. या गुन्ह्याच्या निषेधार्थ काल सोमवारी अकोले शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी श्री. नाईकवाडी बोलत होते. यावेळी अनेक युवक कार्यकर्ते या मूक मोर्चात सहभागी झाले होते.

यावेळी आ. डॉ. लहामटे यांच्या समर्थनार्थ संपतराव नाईकवाडी, संजय वाकचौरे, महिला अध्यक्षा स्वातीताई शेणकर, ज्येष्ठ नेते अरुण रुपवते, किसान सेल युवक अध्यक्ष जलिंदर बोडके, भाविक खरात, जिल्हा युवती उपाध्यक्ष गौरी शेटे आदींची भाषणे झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशराव गडाख, पोपटराव दराडे, मारुती भांगरे, चंद्रभान नवले, विजय देशमुख, ईश्वर वाकचौरे, संदीप शेणकर, महेशराव वैद्य, अंकुश वैद्य, अण्णा ढगे, संतोष परते, तान्हाजी देशमुख, सचिन चौधरी, प्रकाश देशमुख, रामनाथ शिंदे, संकेत चौधरी, संकेत लांडे, आनंद देशमुख, अमोल गोडसे, अमोल लांडे, तुषार राक्षे, आकिब शेख, सचिन पवार यांंच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. डॉ. लहामटे याच्या सूचनेनुसार आजचा निषेध मोर्चा स्थगित करण्यात आला आहे, अशा सूचनांच्या पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध ग्रुपवर दिल्या होत्या. मात्र तरीही काही अतिउत्साही पक्ष कार्यकर्त्यांनी ही सूचना न पाळता पक्ष कार्यालयापासून शहराच्या प्रमुख रस्त्यावरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

परंतु या मोर्चात पक्षाचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, युवक अध्यक्ष रवि मालुंजकर, युवक शहराध्यक्ष अमित नाईकवाडी, बबन वाळुंज यांचयासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांचे समर्थक यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवली.

विशेष म्हणजे हा मूक मोर्चा असताना तहसीलवर मूक मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्याचे दिसले. त्यामुळे मूक मोर्चा हे फक्त म्हणण्यापुरताच मर्यादित राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले. राष्ट्रवादी अंतर्गत या प्रश्नी व नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडीपासून अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आमदार लहामटे यांच्या कार्यपद्धती वरही काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या