Saturday, April 27, 2024
Homeधुळे‘ध्यान’ ठेवि आरोग्य ध्यान!

‘ध्यान’ ठेवि आरोग्य ध्यान!

सर्वांना सुखाची प्राप्ती होवो व सर्वांना आरोग्य लाभले पाहिजे, कुणाला कुठल्याच प्रकारचे दुःख होवू नये. बृहृदाख्यक उपनिषदातील हा श्लोक आजच्या काळातील आपली मनस्थिती वर्णन करणारा मागील एक दीड वर्षापासून आपण सगळे हाच जप करतोय. सर्वांना सुखी ठेव व कुणालाही दुःख होवू नये, सर्वांना आरोग्य लाभो.

21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योगा दिवस. आज सगळीकडे योगाचीच चर्चा. अनेक ठिकाणी मागील 15 दिवसांपासून योगा शिबिरे घेतली जमाहेत, काहींचे साप्ताहिक आहे. व्याख्यानांचे आयोजन केले जातयं मग योगा-डे मुळे सध्यातरी योगाचीच चर्चा, मग वर्षभर काय? त्याचे नियोजन कसं करणार. योगा काय जून महिन्यामध्येच करण्याची गोष्ट नाही, तर वर्षभर अंगिकारावे असे ते व्रत आहे.

- Advertisement -

आजच्या धकाधकीच्या काळात दुर्लक्षित होते, ती गोष्ट म्हणजे आपले स्वतःचे आरोग्य. योग मार्ग हा आरोग्य जपण्याचा उत्तम मार्ग होय. आज बरीच मंडळी योगाकडे आकृष्ट झालेली आहे. व्यायाम, जिम, सकाळी फिरणे, कुठला ना कुठला पर्याय त्यांनी निवडलाय. शारिरीक आरोग्य जपतांना, त्याची तपासणी त्याची चिकित्सा याकरीता आजच्या वैज्ञानिक युगामध्ये झालेली प्रगती अतिशय उल्लेखनीय आहे? परंतु मानसिक स्वास्थ्यच काय? याकरिता आम्हा भारतीयांना ती क्षमता मिळाली आहे. ध्यानाद्वारे अष्टांग योगाद्वारे, म्हणजेच योगमार्गाद्वारे.

‘पातंजल योगसूत्र’ यामध्ये योगाची व्याख्या करतांना पातंजली मुनी म्हणतात ‘योगशिल वृत्ती निरोधः’ योग म्हणजे मनातील (चित्त) विकारांचा निरोध करणे, म्हणजेच थांबविणे. ज्या व्यक्तीला मनात येणार्‍या विकारांवर विजय मिळविता आला. त्या वृत्तींना थोपविता आले की, त्याला योग साध्य झाला असे म्हणता येईल. जीवनामध्ये मुख्य उद्देश हा ‘स्वस्थ’ असणे हा असायला हवा. ‘स्व’ म्हणजे आपण स्वतः आपले अस्तित्व हेच मुलतः सुखमय आहे. त्यामध्ये ‘स्थ’ म्हणजेच स्थित असलो की आपण आपोआपच सुखी होतो. आपले अस्तित्व हे मनाशी व शरीराशी संबंधित आहे. शरीर व मन हे त्यांची कार्य सुविहीतपणे करण्याला अनुकूल असेल म्हणजेच स्वस्थ असेल, तर आपणही आपोआपच स्वस्थ असतो. म्हणून आपले शरीर व मन हे दोन्ही ही स्वस्थ असावयास हवे.

मनाची प्रसन्नता, जर प्राप्त करुन घ्यायची असेल तर ते साध्य होईल. ‘अष्टांग योगाद्वारे’ अष्टांग योग- यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या उपरोक्त अष्टांग योगाद्वारे व्यक्तीचे अंतः व बहिपरिमार्जन होते. शरीर व मन दोहोंची शुध्दी यामध्ये साधली जाते. यम-अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, नियम- शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, आसन- सुखपूर्वक स्थिर बसणे, प्राणायाम- श्वासाच्छेवास या मनुष्याच्या जन्मजात स्वाभाविक प्रक्रियेमध्ये श्वास प्रश्वासाच्या गतीला प्रयत्न पूर्वक नियंत्रित करणे. प्रत्याहार- इंद्रियांना त्यांच्या विषयांचे भोग अत्यंत आवश्यक तेवढेच व नियंत्रित स्वरुपात देणे व विषयाकडे आकृष्ट होणारी इंद्रियांची लालसा मनः संयमाने नियंत्रित करणे. धारणा- चित्ताला, मनाला कोणत्याही एका देशावर म्हणजेच स्थानावर जणू बांधून ठेवल्या प्रमाणे स्थिर करणे. ध्यान- एका क्षणाला जी भावना चित्तात असेल, तीच पुढील अनेक क्षणात टिकणे.

तत्र प्रत्यैक्तानता ध्यानम (पातंजल योग) भावनेची, प्रत्ययाची, एकतानता साधणे म्हणजेच ध्यान. समाधी- सर्व योगाची अंतिम फलप्राप्ती, परिनिती ही उच्च कोटीची जीवन अवस्था होय. ती तुम्हा आम्हास साध्य होणे शक्यच नाही.

रुग्ण जेव्हा रुग्णालयात येतात तेव्हा बर्‍याचदा ते सर्वसाधारणपणे तक्रार करतात ती ‘निद्रानाशाची’ म्हणजेच त्यांचे निद्रेचे प्रमाण हे कमी झालेल असते व योग्य स्वरुपात निद्रा झाल्यावर जे फायदे शरीरास मिळावयास हवे, ते मिळत नाहीत. मन प्रसन्न राहत नाही व त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन कामकाजावरही होतो. कोवीड-19 च्या जनपदोध्वंस काळामध्ये तर ताण-तणाव अधिक वाढलाय. काहींच्या नोकर्‍या गेल्यात, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. शारीरिक, मानसिक बरोबर आर्थिकरित्याही जीवनात अस्थिरता आली. मग चिडचिड आक्रमकता यांचा अतिरेक व्हायला लागला. शिराशूल, निद्रानाश असे अनेक व्याधी घर करु लागले. आज देखील लॉकडाऊन नसला तरी आपल्याला सर्व नियम पाळून शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे व सोबतच मनाची देखील. त्याकरिता मी अशा व्यक्तींना रोज ध्यान करण्याचा सल्ला देते. सध्या शाळा बंद असल्यामुळे लहान मुले घरात बंदिस्त राहून चिडचिड करायला लागली आहेत, विद्यार्थी द्विधा मनःस्थितीत मग ते दहावीचे असो, की बारावीचे वा महाविद्यालयीन त्यांच्याही अनेक तक्रारी आहेतच. मग विद्यार्थ्यांकरीता देखील ध्यान हा उत्तम उपाय आहे. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता वाढविण्याकरिता ध्यान हा उत्तम उपाय आहे.

ध्यानाचा सोपा अर्थ आहे ‘लक्ष्य’ आपलं मन हे अणुस्वरुप असतं. त्याची गती अतिशय वेगवान असते. जगात मनाच्या गती इतकी तीव्र गती कशाचीच नाही. आपले मन कधी इथे भारतात, तर कधी अमेरिकेत तर लगेच चंद्रावरही पेाहोचेल, फारच जलदगती नेहमी व्यस्त असा कार्यक्रम आपल्या मनाचा असतो. नेहमी कुठल्यातरी विचारात ते असतं. त्याला विश्रांती ही नसतेच कधी मन चचंल आहे. त्याचे संकल्प विकल्प सुरुच असतात. मनाचे हे खेळ कोण बघतो? तो बघणारा आत्मा आहे म्हणजेच आपण स्वतः आहोत. हे स्वतःचे रुप ओळखणे म्हणजेच आत्मज्ञान होय. या ज्ञानापेक्षाही ध्यानाला श्रेष्ठ म्हटलेले आहे. ‘ज्ञानात ध्यानं विशिष्टते’ हे गीतावचन प्रसिध्द आहे.

नर! ध्यान दे वह ध्यान मे, फिर ध्यान न हो ध्यान में

हो मस्त आपने स्थान में, ना दूर हो फिर जान में ।

नहि ध्यान ध्याता ध्येय भी, त्रिपुटी परे चढ जाऐगा,

मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या ओळी, ‘योग’ विषयामध्ये याचा उल्लेख मी का केला? तर त्याला कारण ‘सामुदायिक ध्यान’ महाराजांनी गावागावामध्ये सामुदायिकरित्या ध्यान व प्रार्थना करावयास सांगितलेली आहे. तर काही ठिकाणी ती होतेही. हा काही आध्यात्मिक विषय नाही तर मनाच्या त्रिगुणांपैकी सत्व वाढविण्याकरीता व रज, तम, गुणांवर नियंत्रण करण्याकरिता आपण याचा उपयोग करु शकतो.

यम, नियमांचे पालन करुन आसनांचा सराव केला की, पुढे प्राणायाम, त्रिवार ओंकार प्रार्थना, सूक्ष्म हालचाल नंतर सूर्यनमस्कार व नंतर इतर आसने क्रमाक्रमाने शिकून घ्यावी. व सोबतच प्राणायाम. प्राणायाम अनुलोन. विलाम, नाडी शोधन प्राणायाम करावा. तसेच भ्रामरी, उज्जायी अस्त्रिका, सुर्यभेदन, चंद्रभेदन शीतली, सित्कारी यांच्या देखील गुरुंच्या मार्गदर्शनामध्ये अभ्यास करावा. ध्यानाकरिता कोणत्याही एका आसनात बसावे जसे की स्वस्तिकासन, सिध्दासन, वज्रासन यापैकी एक आसन घेवून एक विशिष्ट ध्येयनिश्चिती करणे. उदा.गुरुची प्रतिमा, नास्तग्र भ्रुमध्य व नंतर ध्यान करावे. ध्यायानाचे विविध प्रकार आहेत. झेन मेडिटेशन, प्रेक्षाध्यान, विपश्यना आर्ट ऑफ लिव्हिंग, सायक्लिक मेडीटेशन, नादानुसंधान, पातंजलमुनींनी सांगितलेले ध्यान. यापैकी कोणतेही ध्यान आपण करु शकतो. ध्यानाचा जो आरोग्यकरिता फायदा होतो. तो प्रयोगाद्वारे देखील सिध्द झालेला आहे. या अंतर्गत आपल्या शरिरामध्ये होणारे ऑक्सिजनचे कन्झम्पशन, कार्बनडायऑक्साईडचे आऊटपूट, शरीराचा बीएमआर, श्वासगती, नाडीगती, ईसीजी आणि ईईजी तसेच जीएसआर यांचे परिक्षण करण्यात आलेले आहे. यासोबतच आणखीही काही महत्वाचे परिणाम शरीरावर दिसून येतात. जसे वजन कमी होणे, रक्तदाब नियंत्रित राहणे (उच्च स्तरावरच्या रुग्णांकरिता) नाडीगत सम्यक राहणे, श्वसनाचा वेग हा कमी होणे, शरीराचे तापमान कमी होणे, रक्तशर्कराचे प्रमाण कमी होणे, तसेच ध्यानाचा परिणाम केले असता त्यात बदल झालेला आढळतो. इतके फायदे जर ध्यानाचे आपल्याला घ्यावयाचे आहे. तर निश्चितच शास्त्रशुध्द पध्दतीने आपण ध्यान करावयास हवे. यामध्ये साधे सरळ आपल्याला जमेल ते सुखासन (मांडी घातली तरी चालेल) करायला हवे. शरीराच्या या स्थितीचा सुध्दा, रक्तपुरवठा व मेंदू या दोन्ही घटकांना आरोग्यदायी लाभ मिळत असतो व भ्रूमध्यावर लक्ष केंद्रीय करून मनात एकच विचार ठेवणे याकरिता ओंकार जप हा उत्तम मार्ग आहे. हळूहळू अभ्यासाने मनाची एकाग्रता आपल्याला वाढविता येईल. मन भटकणार नाही, त्यावर आपले नियंत्रण राहील. ध्यान करण्याकरिता, त्या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घेवूनच करावे.

– डॉ.प्रा.सौ.जया जाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या