‘वैद्यकीय’च्या अपंग विद्यार्थ्यांनाच महाविद्यालय बदलण्याची मुभा; 40 टक्के अंपगत्व असलेल्या विद्यार्थ्यालाच सुविधा

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलण्याची मुभा आता काढून टाकण्यात आली आहे. 40 टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनाच दुसर्‍या वर्षांला महाविद्यालय बदलता येणार आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत अभ्यासक्रम सोडलेल्या किंवा निकालानंतर अनुत्तीर्ण झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर दुसर्‍या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. गंभीर आजार असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत असत. मात्र, गंभीर आजार असल्याचे खोटे कारण सांगून बनावट कागदपत्रे विद्यार्थी सादर करत असल्याचे समोर आले होते.

या पार्श्वभूमीवर आता आजारी विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलून देण्याचे धोरण बदलण्यात आले आहे. यानंतर 40 टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षी महाविद्यालय बदलता येणार आहे. यापूर्वी महाविद्यालय बदलण्याच्या अर्जाबरोबर विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागत असे. आता अपंगत्व प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

पालकांचा आक्षेप

यंदा निवडणुकीच्या प्रक्रियेत महाविद्यालय बदलून देण्याची प्रक्रिया लांबली आहे. त्यातच आता अचानक वैद्यकीय शिक्षण विभागाने अट बदलल्यामुळे पालकांनी आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना न देता यंदापासूनच नवी अट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे खरेच गंभीर आजार आहे, मात्र अपंगत्व नाही किंवा प्रवेश घेतल्यानंतर आजाराचे निदान झाले आहे अशा विद्यार्थ्यांची ओढाताण होणार आहे. त्यांना त्यांच्या घराजवळील, परिसरातील महाविद्यालय मिळण्याची शक्यता यामुळे मावळणार आहे, असे पालकांचे म्हणणे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *