Friday, April 26, 2024
Homeनगरमार्केट यार्डचे बंद गेट ओपन

मार्केट यार्डचे बंद गेट ओपन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदारांनी सांगूनही नगर बाजार समितीचे गेट उघडले नाही. व्यापार्‍यांची होणारी अडचण लक्षात घेत नगर शहर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी कुलूप तोडून हे गेट आज ओपन केले.

- Advertisement -

व्यापारी, शेतकर्‍यांना बाजारसमितीकडून त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तेथे शिवसेना खंबीर उभी राहिलं असे सांगत शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी हे गेट ये-जा करण्यासाठी खुले केले.

माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेना युवा नेते विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे ,अमोल येवले, विशाल वालकर, मदन आढाव, संतोष गेनप्पा, मनिष गुगळे, सचिन शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी कुलूप तोडून गेट ओपन केले.

अनेक दिवसांपासून बाजारसमितीचे गेट एका बाजूने बंद होते. या बंद प्रवेशव्दारामुळे व्यापारी, शेतकर्‍यांना अडचण निर्माण होत होती. बंद गेट खुले करावे अशी व्यापारी, शेतकर्‍यांची मागणी होती. सनदशीर मार्गाने लढा देणार्‍या व्यापार्‍यांना यश आले नाही. त्यामुळे शिवसेनेने या प्रश्नात दखल घेत कलेक्टरांसमोर हा प्रश्न उपस्थित केला.

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत हे गेट खुले करावे अशा सूचना खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. मात्र संबंधितांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. शिवसैनिकांनी आज गेटचे कुलुप तोडून गेट उघडले. जिथे जिथे व्यापारी, शेतकरी अन्याय अडचणी तसेच बाजारसमितीकडून त्रास देण्यात येईल तिथे शिवसेना खंबीरपणे उभी राहील, असे सातपुते यांनी यावेळी सांगितले.

बाजार समितीची कलेक्टरांकडे तक्रार

शिवसेना आंदोलकांनी घोषणाबाजी करत कुलूप तोडून गेट खुले केल्याची तक्रार बाजार समितीने कलेक्टरांकडे केली आहे. कलेक्टर हे रस्ता सुरक्षा समितीचे सचिव आहेत. मे 2018 मध्ये तत्कालीन खा. दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत गेट बंद करून एकेरी वाहतूक करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर ट्राफिक पोलिसांनी तसे पत्र बाजार समितीला देऊन गेट बंदची सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी मार्केट कमिटीने केली. शेतकरी, व्यापार्‍यांनी गेट खुले करण्याची मागणी केली, पण प्रशासनाकडून अद्याप तसे कोणतेच आदेश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे हे गेट बंद होते. आज दिलीप सातपुते, संदेश कार्ले यांच्यासह शिवसैनिकांनी घोषणबाजी करत कुलूप तोडून गेट खुले केल्याचे मार्केट कमिटी प्रशासनाने कलेक्टरांना कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या