Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीआधी CM एकनाथ शिंदेंचं मोठे विधान; म्हणाले, “कोर्टात टिकेल असं…”

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यामध्ये चांगला तापला आहे. आरक्षणासाठी जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाज आंदोलन करत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आजचा चौदावा दिवस आहे. अशात मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekant Shinde) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्य सरकारचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. त्याचबरोबर आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं आहे. मात्र, यासाठी आपण कुणाची फसवणूक करू शकत नाही. कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाला देखील विनंती करणार आहोत. शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करण्याचं काम सुरू आहे. या सर्व कारवाईला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी मराठा समाजाने आम्हाला थोडा वेळ द्यायला हवा.”

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आता पाण्याचाही त्याग केल्यामुळे सरकारकडून आता आरक्षणावर ठाम निर्णय घेणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सर्वपक्षीय बैठकीत सरकार काय निर्णय घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता देणार आहे. त्यासाठीच सर्वपक्षीय बैठक बोलवली असून आरक्षणावर आता सूचना काय येणार त्यावरही विचार विनिमय करुन सरकार टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय. आरक्षणाबाबत सत्ताधारींसह विरोधी पक्षांचीही मतं जाणून घेतली जाणार आहेत. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेलं आंदोलन, कुणबी समाजाचा मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र देण्यास असलेला विरोध तसंच ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास असलेला ओबीसी समाजाचा विरोध या विषयांवर आज सह्याद्री अतिथीगृहात संध्याकाळी 7.30 वाजता चर्चा होणार आहे. या बैठकीला ठाकरे गटाकडून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शरद पवार गटाकडून जयंत पाटील, राजेश टोपे, काँग्रेसकडून अशोक चव्हाण, थोरात, वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत..

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *