Wednesday, April 24, 2024
Homeनाशिककांदा पिकाला पर्याय मका

कांदा पिकाला पर्याय मका

नाशिक । विजय गिते Nashik

जिल्ह्याच्या विशेषतः पूर्व भागात मोठ्या प्रमाणात खरीप मक्याचे पीक घेतले जाते.या पट्टयात मका बरोबरच कांद्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता होती.

- Advertisement -

मात्र,पावसामुळे मोठ्या प्रमाणात कांदा रोपे बुरशीजन्य रोगाने जमिनीतच सडली.त्यातच आता टाकलेली लाल, उन्हाळ कांदा रोपे मुसळधार पावसाने झोडपले आहेत. त्यामुळे पुढे कांदा रोपांची शाश्वती नसल्याने शेतकर्‍यांचा खरिपापाठोपाठ आता रब्बीतही मका लागवड करण्याचा कल दिसून येत आहे.यामुळे रब्बी हंगामात मका लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

कांदा रोपांची उपलब्धता कमी असणार आहे.त्यामुळे रब्बी हंगामात हरभरा, गहु, कांदा पिकाबरोबर आता मका पिकाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याने शेतकर्‍यांना आता उन्हाळी मका पिकाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.कारण पुर्वी शेतकरी खरीपातील मका पीक घेतल्यानंतर रब्बीतील उन्हाळी मका घेत नव्हते,पण आता मागील वर्षांच्या अनुभवावरून रब्बीतही मका पीक चांगल्याप्रकारे येत असल्याने मका क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरिपातील मक्याला लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मका पिकाला औषधांचा खर्च कमी प्रमाणात येऊन मका पीक चांगले आले आहे.मात्र, यावर्षी बुरशीजन्य रोग व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात लाल,उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान झाल्याने व कांदा बियाण्या़चा तुटवडा असल्याने शेतकर्‍यांनी रब्बीतही उन्हाळी मका घेण्याचा पर्याय शोधला आहे. यातून शेतकर्‍यांना जनावरांना चारा उपलब्ध होऊन मक्याचेही उत्पादन मिळणार आहे.मकाबरोबरच भाजीपाला लागवडही वाढणार आहे.

मुरघासाला वाढती मागणी

गतवर्षी कांदा रोपांचा तुटवडा,त्यातच गगनाला भिडलेले कांदा रोपांचे भाव यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात मका लागवड केली होती.या मका लागवडीतून शेतकर्‍यांना मक्याचे उत्पादन झालेच शिवाय मक्यापासून तयार होणार्‍या मुरघासालाही पशुपालकांकडून मोठी मागणी होती.यातून शेतकर्‍यांना चार पैसे अधिक मिळाले होते.याही वर्षी मुरघासाला मागणी राहिल अशी शक्यता आहे.त्यामुळे मका लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या