उद्योजकांना चांगली सेवा देणे महावितरणचे कर्तव्य – बेळे

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उद्योजक (Entrepreneur) हे महावितरणला (Mahavitran) सर्वाधिक महसूल मिळवून देणारे महत्त्वाचे ग्राहक असून त्यांना विनाखंड आणि नियमित वीज पुरवठा करणे हे महावितरणचे आद्य कर्तव्य असल्याचे मत निमा अध्यक्ष धनंजय बेळे (Dhananjaya Bele) यांनी व्यक्त केले…

महावितरणच्या सेवा सप्ताहाचा (Service Week of Mahavidran) शुभारंभ निमा हाऊस (सातपूर) येथे झाला. त्यावेळी बेळे बोलत होते. या साप्ताहांतर्गत सातपूर, अंबड,गोंदे तसेच सिन्नर एमआयडीसी ग्राहकांना महावितरणतर्फे तातडीच्या सेवांसाठीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता चेतन वाडे, एच.एच. चौरे,ऋषीं जोगळेकर, अजिंक्य जोशी, निमाचे उपाध्यक्ष आशिष नहार, उर्जा समितीचे चेअरमन रवींद्र झोपे, मिलिंद राजपूत, सुधीर बडगुजर, प्रवीण वाबळे, राजेंद्र वडनेरे, विश्वजित निकम आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा सप्ताह फक्त आठ दिवसांपुरताच मर्यादित न ठेवता सातत्याने आपण एकमेकांच्या संपर्कात राहून उद्योजकांच्या विजेबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे अशी आग्रही मागणी बेळे यांनी यावेळी केली. तर कार्यकारी अभियंता वाडे यांनी उद्योजकांच्या मागण्यांचा प्राधान्यक्रमाने विचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच निमा हाऊस सातपूर व सिन्नर येथे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी स्वतः तसेच सहकारी अधिकारी उपलब्ध असतील आणि जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी तसेच तत्पर सेवा देण्यास कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.

यावेळी औद्योगिक ग्राहक निक्षय फूडचे संचालक अक्षय पाटील यांना तातडीने औद्योगिक मीटर प्रदान करून महावितरणने आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवली. महंत एंटरप्राइजेसचे धर्मेश पोरया यांच्या कंपनीच्या नांवात तातडीने बदल करून देण्यात आला. तर महावितरणने तातडीने समस्या सोडविल्याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांचे निमा तर्फे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीचे हे फलित असल्याची चर्चा उद्योजकांमध्ये होती. महावितरणने एक पाऊल पुढे टाकले आहे. उद्योजक दोन पावले पुढे येऊन त्यास प्रतिसाद देतील असे आश्वासन निमा तर्फे यावेळी देण्यात आले. या विशेष सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी १५० जणांचे प्रश्न तातडीने मार्गी लागल्याने उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *