Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानिर्यातक्षम द्राक्षाला कवडीमोल भाव

निर्यातक्षम द्राक्षाला कवडीमोल भाव

निफाड । प्रतिनिधी

करोना संसर्गाचा फायदा उठवत यावर्षीदेखील निर्यातदार व्यापार्‍याकडून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक सुरू असून दिंडोरी तास येथील योगेश फकिरा गांगुर्डे यांचा 23 क्विंटल माल साकोरे मिग येथील कालिया एक्सपोर्टच्या व्यापार्‍याने खुडून नेल्यानंतर डावणीचे कारण देत सदर माल परत पाठवल्याने गांगुर्डे यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले असून आता ते द्राक्षासाठी लोकल व्यापारी पाहत आहेत. दिंडोरीप्रमाणे तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना अशाच प्रकारे व्यापार्‍यांनी कमी भाव करत द्राक्ष घेणे सुरू केल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

- Advertisement -

दिंडोरी तास येथील शेतकरी योगेश फकिरा गांगुर्डे यांनी साकोरे मिग येथील कालिया एक्सपोर्ट नामक द्राक्ष व्यापार्‍यास 45 रु. किलोप्रमाणे आपल्या द्राक्षबागेचा सौदा केला होता. सौदा करण्यापूर्वी संबंधित व्यापार्‍याच्या माणसांनी द्राक्षबागेची पाहणी केली. त्यानुसार हार्वेस्टिंग करून रविवारी सदर व्यापार्‍याच्या 10 मजुरांनी दिवसभरात द्राक्षबागेतून 23 क्विंटल द्राक्षमाल काढून त्याची पॅकिंग केली. परंतु सदरचा द्राक्षमाल साकोरे मिग येथील शीतगृहात खाली उतरवताच सदर व्यापार्‍याने शेतकरी गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधत हा द्राक्षमाल चालणार नाही, तो परत घेऊन जा, असे सांगितले.

त्यावर कारण विचारले असता द्राक्षघडांवर डाऊनीची पाकळी आली असल्याचे सांगितले. त्यामुळे आता हा खुडलेला माल कसा विक्री करायचा? असा प्रश्न गांगुर्डे यांना पडला आहे. कालिया एक्सपोर्टच्या व्यापार्‍याने द्राक्षमालाची पाहणी केली. द्राक्ष खुडून नेले आणि नंतर सबब सांगून माल परत पाठवला. त्यामुळे आता आमच्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. वर्षभर मेहनत घ्यायची, निर्यातक्षम द्राक्षाचे पीक घ्यायचे आणि विक्री करताना नानाविध संकटांचा सामना करायचा हे चक्र आता नित्याचेच झाले आहे.

आजही माझ्या द्राक्षबागेत 70 ते 80 क्विंटल द्राक्षमाल शिल्लक असून आता ही द्राक्षे स्थानिक व्यापार्‍यांना पडेल त्या भावात विक्री करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नाही. स्थानिक व्यापारीदेखील अत्यंत कमी भावात द्राक्षमाल मागू लागले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची होणारी लूट थांबवण्यासाठी शासनस्तरावरून ठोस प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत गांगुर्डे यांनी व्यक्त केले.

बेभरवशाचा भाव

मी द्राक्षमालाचे भाव ठरवताना संबंधित व्यापार्‍याने माछ्या द्राक्षबागेची पाहणी करून मगच भाव ठरवला. त्यानुसार त्यांनी बागेची हार्वेस्टिंग केली. माल खुडून नेल्यानंतर द्राक्षे चालणार नाही असे सांगून अडवणुकीचे धोरण अवलंबवले. त्यामुळे माझे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अद्यापही माझा 70 ते 80 क्विंटल द्राक्षमाल शिल्लक असून त्यासाठी लोकल व्यापारी पाहत आहे. निर्यातक्षम द्राक्ष पिकासाठी मी मोठ्या प्रमाणात खर्च केला. रात्रीचा दिवस करून बागेला औषधांची फवारणी केली, पाणी दिले आणि आता यावर्षी द्राक्षबागांची भाव पडले आहेत. त्यामुळे आता पिकावर झालेला खर्च फिटणार तरी कसा? अशी चिंता भेडसावत आहे.

योगेश गांगुर्डे, शेतकरी (दिंडोरी तास)

- Advertisment -

ताज्या बातम्या