Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याLoksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात 'मविआ' दाखवणार 'महायुती'ला अस्मान?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात ‘मविआ’ दाखवणार ‘महायुती’ला अस्मान?

मुंबई | Mumbai

आगामी लोकसभा निवडणुकींसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. इंडिया आणि एनडीए यांच्यात यंदा कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे आणि सी वोटरने केलेल्या मूड ऑफ नेशनच्या सर्वेतही वेगळा अहवाल प्राप्त झाला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा येतील असा अंदाज या सर्व्हेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

या सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणुकीत मविआतील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना, शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीला सर्वाधिक २८ जागा मिळतील. यात ठाकरे व पवारांच्या पक्षांचा १८ जागा मिळतील. तर काँग्रेसचा १० जागांवर विजय होईल. दुसरीकडे, भाजपला या निवडणुकीत अवघ्या १५ जागा मिळतील. तर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या गटाला अवघ्या ५ जागांवर विजय मिळेल, असे या सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.

या सर्व्हेत महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीवर वंचित बहुजन आघाडी व भारत राष्ट्र समितीच्या कामगिरीचा निकालावर परिणाम दिसणार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या २ पक्षांचा प्रस्थापित राजकीय पक्षांना फटका बसणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय पातळीवरही भाजप प्रणित एनडीए व काँग्रेस प्रणित विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये मतांच्या टक्केवारीचा फारसा फरक दिसत नाही. या सर्व्हेनुसार, एनडीएला ४३ टक्के, तर इंडियाला ४१ टक्के मतदान मिळेल. या प्रकरणी दोन्ही आघाड्यांना मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीत अवघ्या २ टक्क्यांचा फरक असल्यामुळे लोकसभा निवडणूक फारच अतितटीची होताना दिसून येत आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान लोकसभेच्या ५४३ मतदार संघात इंडिया टुडे आणि सी व्होटरकडून सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेदरम्यान २५ हजार ९५१ जणांनी आपली मते नोंदवली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या