Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच, चौकशीचे आदेश

मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच, चौकशीचे आदेश

मुंबई / प्रतिनिधी
राज्याच्या प्रशासनाचे सर्वोच्च केंद्र असलेल्या मंत्रालयात मंगळवारी दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकारामुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दारूच्या बाटल्या मंत्रालयात कशा आणल्या गेल्या याची चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

राज्यातील बारा कोटी जनतेला डोळ्यासमोर ठेवून ज्या मंत्रालयात धोरणात्मक निर्णय होतात त्या मंत्रालयाच्या वास्तूत मद्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यावर मंत्रालय प्रशासनात खळबळ उडाली. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत उपहारगृहाच्या बाजूला तळमजल्याच्या आसपास अडगळीत जागेत दारूच्या बाटल्यांचा खच असल्याचे आज निदर्शनास आल्यावर तत्काळ त्या बाटल्या हटवण्यात आल्या.

- Advertisement -

मंत्रालयात अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था असते.जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अशावेळी मंत्रालयात दारू रिचवणारे तळीराम कोण याचा शोध घेण्यात येणार आहे.

या प्रकाराबाबत सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.याबाबत बोलताना भरणे म्हणाले की, या बाटल्या येथे कशा आल्या? तसेच यामध्ये दोषी कोण आहे? या संबध प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे मी आदेश दिले आहेत.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या गंभीर प्रकाराची गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे दरेकर यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या