वडिलांच्या वर्षश्रध्दाला घरी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

मोक्का व दरोड्याच्या गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार त्याच्या वडिलाचे वर्षश्रध्दाला येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. चंदु ऊर्फ चंद्रकांत भाऊसाहेब घावटे (वय 29 रा. शेळकेवाडी, राजापुर ता. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजाराम चंदर ढवळे (वय 44 रा. राजापुर) यांची राजापुर शिवारात घोड नदीपात्रालगत शेत जमीन आहे. ढवळे हे त्यांच्या शेेत जमिनीमधील माती विक्री करत असतात. दरम्यान 28 मे, 2021 व त्यापूर्वी संतोष राधू शिंदे (रा. राजापुर) व त्याच्या इतर साथीदारांनी ढवळे यांना वेळोवेळी दमदाटी करून, बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या शेतातील माती बळजबरीने चोरून नेली आहे. या प्रकरणी ढवळे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात दरोडा, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आरोपींविरूध्द वाढीव मोक्का कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान सदर गुन्ह्यात पसार आरोपी घावटे हा त्याच्या वडिलाच्या वर्षश्रध्दाला येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस अंमलदार बबन मखरे, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, विशाल दळवी, शंकर चौधरी, आकाश काळे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने राजापुर शिवारात सापळा लावून आरोपी घावटे याला ताब्यात घेत अटक केली आहे.

आठ गंभीर गुन्हे

अटक केलेला आरोपी चंद्रकांत घावटे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूध्द पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मोक्का, खूनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी व गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरूपात आठ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये शिरूर (पुणे) पोलीस ठाण्यात तीन तर बेलवंडी (अहमदनगर) पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *