पुण्यात मुसळधार पाऊस; नागरिकांच्या चिंतेत वाढ

jalgaon-digital
2 Min Read

पुणे : कोरोनाच्या संसर्गामुळे नागरिक हवालदिल झालेल्या नागरिकांच्या चिंतेत आता अवकाळी पावसाचिभर पडली आहे. वादळी वारा, ढगांचा गडगडात आणि विजा यांसह मुसळधार पावसाने पुणे शहर आणि परिसराला झोडपून काढले. अवकाळी पाऊस झाल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

हवामान खात्याने बुधवार वातावरण बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असल्याचे सांगितले होते. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबईसह पुण्यातही पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातही मंगळवार रात्रीपासून ढगाळ वातावरण आहे. बुधवारीही शहरातील अनेक भागात पाऊस पडला होता. येत्या तीस तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहील. तर काही ठिकाणी शहरात आणि जिल्ह्यात तुरळक पाऊस पडेल.

तुरळक ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर वादळवाराही निर्माण होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस बरसल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

पुण्यामध्ये दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास शहराच्या विविध भागांत काळेभोर ढग दाटून आले व मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरूवात झाली. वार्‍याचा वेग ताशी ४० किलोमीटर वेगाने असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली. शिवाजीनगर, धायरी, स्वारगेट, सिंहगड रस्ता, कात्रज, कोथरूड, बाणेर, पुणे विद्यापीठ परिसर, डेक्कन परिसरासह मध्यवर्ती पेठांमध्ये पावसाने सुमारे पाऊण तास चांगलाच धुमाकूळ घातला. त्यानंतर पुन्हा ५ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली तो पुढे उशिरापर्यंत सुरु होता.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन असल्या कारणाने शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी नव्हती. परिणामी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नाही. बहुतांश पुणेकर घरीच असल्याने त्यांना पावसाचा फटकाही बसला नाही. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वार्‍यांमुळे राज्याच्या दिशेने बाष्पयुक्त ढगांची निर्मिती होत आहे. परिणामी ठिकठिकाणी पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आले. .

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *